आषाढीचं एक नवं ‘रिंगण’! - Marathi News 24taas.com

आषाढीचं एक नवं ‘रिंगण’!

www.24taas.com, मुंबई
रिंगण या पहिल्या आषाढी अंकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात प्रकाशन
आपल्याकडे दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. गुढीपाडवा आणि गणपतीचेही विशेषांकही निघतात. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा. मग आषाढी अंक का नाही? म्हणूनच 'आषाढीचा वार्षिक अंक' ही नवी संकल्पना यंदाच्या आषाढी एकादशीपासून प्रत्यक्षात येत आहे. 'रिंगण' नावाने सुरु होणा-या या वार्षिकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीला म्हणजे शनिवार ३० जूनच्या पहाटे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
 
यावर्षीपासून 'रिंगण' दर आषाढी वारीला प्रसिद्ध होणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक अंगाने मागोवा असेल. दरवर्षी एक संत आधुनिक दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न त्यात असेल. कारण गेली आठशे वर्षे संतपरंपरा हाच महाराष्ट्राचा मुख्य सांस्कृतिक प्रवाह आहे. यात अध्यात्मासोबतच सामाजिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. हा दृष्टिकोन आजच्या काळानुसार मांडणं हा या अंकामागचा उद्देश आहे.
 
या वर्षीचा विशेषांक संतशिरोमणी नामदेवांवर आहे. आठशे वर्षांपूर्वी समतेच्या विचारांची ध्वजा घेऊन नामदेवराय तामिळनाडू ते सिंध पंजाबपर्यंत फिरले. त्यांनी अनेक भाषांमध्ये लिहिलं. नानक,  कबीर, नरसी मेहता, मीरा, रोहिदास अशा उत्तरेतील संतपरंपरेचा पाया घातला. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेला आकार दिला. सर्व जातीच्या संतांना एकत्र केलं. चंद्रभागेच्या तीरावर क्रांती केली. म्हणूनच आज देशभर श्री विठ्ठलापेक्षाही नामदेवांची मंदिरं जास्त आहेत. पाकिस्तानातही त्यांची मंदिरं आहे. देशातील लाखो लोक त्यांचं नाव आपली ओळख म्हणून लावतात. त्यांच्या या कार्याची ओळख यंदाच्या 'रिंगण'च्या १२० पानी अंकातून करून देण्यात आली आहे.
 
सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड या पत्रकारांनी 'रिंगण' चं संपादन केलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रशिल्पकार भास्कर हांडे यांनी चितारलेलं नामदेवांचं अत्यंत अभ्यासपूर्ण असं रूप 'रिंगण' च्या मुखपृष्ठावर आहे. उत्तर भारतात पंजाब (नीलेश बने), दिल्ली (गिरीश अवघडे), राजस्थान (दानाराम छिपा),  गुजरात (धवल पटेल) असं जिथपर्यंत नामदेव गेले त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन लिहिलेले स्पेशल रिपोर्ट या अंकात आहेत. याशिवाय नरसी नामदेव हे नामदेवांचं जन्मगाव (प्रशांत जाधव), पंढरपूर ही कर्मभूमी (पराग पाटील) या ठिकाणी जाऊन केलेलेही रिपोर्ताज यात वाचायला मिळतील. अनेक मान्यवरांचे नामदेवांविषयचे लेख यात आहेत. भालचंद्र नेमाडे, भारतकुमार राऊत, अशोक कामत, नि. ना. रेळेकर,  रामदास डांगे, वीणा मनचंदा, शिवाजारीव मोहिते, संजय सोनवणी, आप्पासाहेब पुजारी, मंगला सासवडे, सुनील यावलीकर, दिलीप जोशी, श्यामसुंदर सोन्नर, अंजली मालकर अशा मान्यवर लेखकांचं नामदेवांविषयीचं चिंतन यात आहे. आपले आडनाव नामदेव लावणा-या महाराष्ट्राबाहेरच्या लाखो लोकांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांची हर्षदा परब यांनी घेतलेली मुलाखत तसेच लंडन येथील खालसा कॉलेजच्या प्राचार्य डॉ. माधवी आमडेकर यांचा लेख यातून ग्लोबल नामदेव समोर आलेले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या साठीनिमित्त त्यांची राजा कांदळकर यांनी घेतलेली प्रदीर्घ मुलाखत या अंकाचं आकर्षण ठरावे.
 
आषाढी एकदाशीला पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापुजेनंतर पहिलं दर्शन घेणा-या वारक-यांचा सत्कार कार्यक्रम दरवर्षी होत असतो. त्याच कार्यक्रमात 'रिंगण' चं प्रकाशन होईल. याशिवाय  www.ringan.in  या वेबसाईटवरही लवकरच हा अंक जशाच्या तसा वाचता येईल. तसेच या अंकात घेता न आलेले लेख तसेच अंकात असलेल्या लेखांच्या सविस्तर आवृत्त्या यात वाचता येतील. शिवाय नामदेवांविषयीचे अंकात असलेले नसलेले फोटोही या वेबसाईटवर उपलब्ध असतील.
 
या १२० पानी देखण्या अंकाची किंमत फक्त ६० रुपये आहे. राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या पुस्तकांच्या दुकानांत हा अंक विक्रीसाठी उपलब्ध असेल. मनोविकास प्रकाशन (०२०- ६५२६२९५०) तर्फे या पुस्तकाचं वितरण करण्यात आलंय.

First Published: Wednesday, June 27, 2012, 17:38


comments powered by Disqus