शिवसेनेने दिला सुखद धक्का - Marathi News 24taas.com

शिवसेनेने दिला सुखद धक्का

www.24taas.com, पुणे
 
शिवसैनिकांचं आंदोलन म्हटलं की ते खास शिवसेनेच्या स्टाईलनं होतं. पुण्यात मात्र आज वेगळंच चित्र दिसलं. शिवसैनिकांनी चक्क नागरिक सुविधा केंद्रातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. रात्रंदिवस काम करून या कर्मचाऱ्यांनी महिनाभरात ३० हजार दाखले नागरिकांना दिले. कर्मचाऱ्यांनाही त्यामुळे सुखद धक्का बसला.
 
शिवसेनेचे आमदार महादेव बाबर आणि शिवसैनिकांनी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. विरोधी पक्ष म्हटलं की सरकारविरोधी आंदोलनं हे ठरलेलं समीकरण आहे. त्यात शिवसेनेसारखा पक्ष असेल तर वेगळ्या स्टाईलने विरोध पाहायला मिळतो. त्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांचा हा सत्कार चर्चेचा विषय ठरला. 'हा सत्कार अपुऱ्या साधन-सुविधा असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आहे. सरकारचा नाही', हे सांगायला शिवसैनिक विसरले नाहीत.
 
या सत्कारासाठी कारण होतं ते नागरिक सुविधा केंद्रातल्या कर्मचा-यांनी केलेल्या कामगिरीचं. केंद्रातल्या कर्मचा-यांनी महिनाभरात विविध प्रकारचे ३० हजार दाखले पालक आणि विद्यार्थ्यांना दिले. यासाठी या कर्मचा-यांनी रात्र-रात्र जागून काढल्या आणि फायलींचा ढीग क्लिअर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध ऍडमिशन्ससाठी मदत झाली.
 
या  नागरिक सुविधा केंद्रात जातीचा, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकिट असे तीस विविध प्रकारचे दाखले येथे मिळतात. अशा महत्वाच्या केंद्रासाठी कर्मचा-यांची कायमस्वरूपी नियुक्ती नाही. तरीही हजारो दाखले देण्याची कामगिरी त्यांनी केलीय.
 
पुण्यातल्या या नागरिक सुविधा केंद्राचं आणखी वेगळेपण म्हणजे  पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका, ३ कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ५० ग्रामपंचायती अशी जवळपास ६० लाख लोकसंख्या या एकाच केंद्रात विविध दाखल्यांसाठी येते.

First Published: Friday, June 29, 2012, 23:49


comments powered by Disqus