Last Updated: Monday, July 2, 2012, 08:41
www.24taas.com, शिर्डी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त साईंची नगरी शिर्डी सजली आहे. तीन दिवस चालणा-या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांचा फोटो आणि साईचरित्राची द्वारकामाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. द्वारकामाईत साईचरित्राच्या अखंड पारायणालाही सुरुवात झाली. गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत येतात. उत्सवासाठी देशाच्या विविध भागातून पायी पालख्यासुद्धा शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
वर्षानुवर्षे साईभक्तांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन साईबाबा संस्थाननं चोख सुरक्षा व्यवस्था केली आहे. भक्तांना राहण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या उत्सव काळात साईसंस्थानच्या प्रसादालयात भक्तांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान या उत्सव काळात व्ही.आय.पी. दर्शन व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय संस्थाननं घेतलाय.
First Published: Monday, July 2, 2012, 08:41