Last Updated: Tuesday, July 3, 2012, 20:32
www.24taas.com, अरुण मेहेत्रे, पुणे 
विविध कारणांनी बदनाम झालेल्या पुणे महापालिका शिक्षण मंडळाचा गैरकारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मंडळाचा एक कर्मचारी तब्बल १० दिवस गैरहजर असताना त्याला पगार पत्रकावर हजर दाखवण्यात आलं. हा कर्मचारी एका मानानियाच्या सेवेत असल्याचीही चर्चा आहे. महादेव तुकाराम माळी याच्या लग्नाची पत्रिका.
त्याचं लग्न १४ एप्रिल रोजी २०१२ उस्मानाबाद मध्ये होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे तो उस्मानाबाद्लाच असणार. शिक्षण मंडळ कार्यालयातले हे कागद मात्र काही वेगळच सांगतात. महादेव हा गोखले नगर मधील वीर बाजीप्रभू शाळेत रखवालदार आहे. स्वत:च्या लग्नासाठी तो ९ ते १९ एप्रिल दरम्यान गैरहजर होता. असं असताना हजेरीपत्रकावर त्याची हजेरी लावण्यात आली. इतकच नाही तर त्याचा पूर्ण महिन्याचा पगारही काढण्यात आला. लग्नासाठी गावाकडे गेलेला कर्मचारी शाळेत हजर कसा असा प्रश्न स्थानिक नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांनी उपस्थित केला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रकार उघडकीस आला तेव्हा संपूर्ण सभागृह अवाक झालं. सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी या विषयावरून शिक्षण मंडळाच्या कारभाराचे वाभाडे काढले. इ लर्निंग स्कूल, शालेय साहित्य खरेदी तसंच शाळांच्या दुरावास्थेवरून शिक्षण मंडळ नेहमीच टिकेच लक्ष ठरलंय. हजेरीपत्रकातील गैरव्यवहारमुळ मंडळाला धारेवर धरण्याला आणखी एक विषय मिळाला. कालच्या प्रकरणानंतर शिक्षण प्रमुख रामचंद्र जाधव हे हॉस्पिटलमध्ये भरती झाले. संबधित कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली.
मात्र त्याला अभय देणार काय, हा प्रश्न कायम आहे. याशिवाय हा कर्मचारी नेमका कुणाच्या दिमतीला आहे याविषयी चर्चा सुरु झाली. एकूण काय तर पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराची लक्तरं पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.
First Published: Tuesday, July 3, 2012, 20:32