पुण्यात अवतरतंय 4 D थिएटर - Marathi News 24taas.com

पुण्यात अवतरतंय 4 D थिएटर

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुण्यात लवकरच मनोरंजनासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. यशवंतराव चव्हाण उद्यानात 4 D थिएटर सज्ज झालंय. विशेष म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेलं अशा प्रकारचं हे देशातलं पहिलंच थिएटर आहे.

 
जादूच्या गालिचावरुन फिरणारा अलिबाबा, ड्रॅक्युलाचा थरार, डायनॉसोरसचा जंगलातला वावर आणि उंच आकाशात झेपावणारा हनुमान... या सगळ्याची प्रत्यक्षात अनुभूती म्हणजे 4 D सिनेमांचा अविष्कार. हा आनंद पुणेकरांना देण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घेतला आहे. यशवंतराव चव्हाण उद्यानात तीसपेक्षा जास्त आसन क्षमतेचं 4 D थिएटर उभारण्यात आलंय. या थिएटरचं वैशिष्ट्य म्हणजे हायड्रोलिक सिस्टिमच्या माध्यमातल्या स्वयंचलित खुर्च्या. पुणेकरांच्या मनोरंजनाबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
 
सुमारे सहा मिनिटांपर्यंतच्या विविध 4  D फिल्मस या थिएटरमध्ये दाखवल्या जाणार आहेत.  विजांचा गडगडाट, वादळ, मुसळधार पाऊस, धुकं हे सगळं या 4 D फिल्म्स पाहताना प्रत्यक्षात जाणवणार आहे. भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांचं नाव या थिएटरला देण्यात आलंय. १७ डिसेंबरला अभिनेत्री शर्मिला टागोर आणि सुभाष घई यांच्या हस्ते या थिएटरचं उद्घाटन होणार आहे.

First Published: Tuesday, December 13, 2011, 12:19


comments powered by Disqus