सांगलीतून थेट दुबईला केसर आंबा - Marathi News 24taas.com

सांगलीतून थेट दुबईला केसर आंबा

www.24taas.com, सांगली
 
द्राक्षांनंतर आता आंब्याचीही सांगलीतून निर्यात होउ लागलीय. सांगलीतल्या प्रविण नाईक यांनी थेट दुबईला केसर आंब्याची निर्यात केलीये. पुन्हा एकदा आंबा लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी शेतकरी उत्साह दाखतायत. द्राक्षापेक्षा आंब्याचं पीक परवडत असल्याचं मत व्यक्त होतंय.
 
आयटीचं शिक्षण आणि स्वत:चा व्यवसाय संभाळुन आंब्याचं दर्जेदार उत्पादन निर्यात करणारे हेच ते प्रविण नाईक. प्रवीण नाईक यांची लिंगनूर गावी ३२ एकर शेती आहे. नाईक यांच्या वडिलांनी १९९२ मध्ये वेगळा प्रयोग म्हणून केसर आंब्याची लागवड केली.त्यानंतर प्रविण यांनी चार वर्ष आंबा पिकाचं शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन आंब्याचं दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन घेण्यात यश मिळवलं.
 
खडकाळ जमिनीवर ३ बाय १५ फुटावर नाईक यांनी १ हजार ९२० झाडे लावली. संपूर्ण बागेत ठिबक सिंचन केलंय, कलमाची वाढ सुरु झाली तसा साडेचार फुट उंचीवर शेंडा खुडला. त्यामुळे झाड उंचीला न वाढता ते पसरत गेले, मुख्य खतांसोबत ठिबकद्वारे खत आणि सूक्ष्मद्रव्य महिन्यातून चार वेळा विभागून दिलं. बागेत ओलावा कायम राहण्यासाठी उसाच्या पाचटाचं मल्चिंग केलं. अशा प्रकारे लागवड आणि व्यवस्थापनेसाठी एकरी सव्वा लाख रुपये खर्च आला. विशेष म्हणजे वाढ नियंत्रकाच्या वापरामुळे फलधारणा लवकर झाली आणि मे महिन्य़ात उतरण झाली. यंदा एक एकरातून 3 टन आंब्याचं उत्पादन नाईक यांनी घेतलंय तसेच किलोला 125 रुपये दर त्यांना मिळालंय.
 
नाईक यांच्या केसर आंब्याला वेगवेगळ्या ग्रेडमध्ये दुबाईला निर्यात करण्यात आली. चव आणि दर्जेदार गुणवत्तेमुळे दुबाईमध्ये या आंब्य़ाला पसंती मिळाली. द्राक्षच्या तुलनेत आंबा परवडत असल्याचं मत ही नाईक यांनी व्यक्त केलंय. आंबा आणि द्राक्षाच्या तुलनेत द्राक्षांचं उत्पादन खर्च वाढता असून पिक संरक्षणासाठी खूप काळजी घ्यावी लागते मात्र त्या तुलनेत आंब्यासाठी खर्च आणि मोहार संरक्षणापलिकडे व्यवस्थापने सोप जातं त्यामुळे भविष्यात द्राक्ष पिकापेक्षा आंब्याचं पिक निश्चित फायदेशीर ठरेल.

First Published: Monday, July 9, 2012, 23:44


comments powered by Disqus