Last Updated: Saturday, July 14, 2012, 11:22
www.24taas.com, पुणे एकीकडे सार्वजनिक वाहतुकीला त्रासलेले पुणेकर रिक्षावाल्याकडूनही हैराण आहेत. भाडं नाकारून प्रवाशांची सर्रास अडवणूक केली जातेय. अशा भाडं नाकारणाऱ्या रिक्षांवर यापुढे कडक कारवाई होणार आहे. भाडं नाकारणाऱ्या रिक्षाची तक्रार आल्यानंतर त्या रिक्षावर पुढील १० ते १५ मिनिटांत कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यात रिक्षाचालक प्रवाश्यांची अडवणूकच नव्हे तर अक्षरशः छळ करतात, अशी तक्रार आहे. भाडं नाकारणं, रात्रीच्या वेळी एखाद्या ठिकाणी न जाणं, जास्त भाडं आकारणं, यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. हे रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारलाय. रिक्षासंदर्भात कुठलीही तक्रार असल्यास ०२०-२६२०८२२५ / २६१२२००० या क्रमांकावर फोन केल्यास किंवा ८८८८००४४५५ या मोबाईल वर एसएमएस केल्यास त्या रिक्षावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिलीय. पुणेकरांनी या कारवाईचं स्वागत केलंय.
वाहतूक शाखेकडून गेल्या सहा महिन्यात सुमारे ३० हजार रिक्षांवर कारवाई करण्यात आलीय. आता आणखी कठोर कारवाईच्या बडग्यानंतर काही फरक पडतो का ते बघावं लागेल.
First Published: Saturday, July 14, 2012, 11:22