पतीने पत्नीचा काढला काटा - Marathi News 24taas.com

पतीने पत्नीचा काढला काटा

www.24taas.com, पुणे
 
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून पतीने तिचा काटा काढल्याची घटना मांढर येथे घडली.  विक्रम शंकर शेवते (३२) यांने पत्नी सुनीता (२९) हिला मांढरदेवीच्या दर्शनासाठी नेण्याच्या बहाण्याने महाडजवळील वरंध घाटातील कावळा कड्यावरून लोटून दिले.
 
सुनीता घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी ती हरविल्याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर विक्रम आणि सुनीता यांच्यामध्ये असलेल्या वादविवादाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी विक्रमची चौकशी सुरू केली. त्यानंतर विक्रमने सुनीताला कड्यावरून दरीत ढकलून दिल्याची कबुली दिली.  मांढरदेवीच्या दर्शनासाठी नेण्याच्या बहाण्याने महाडजवळील वरंध येथे विक्रमने तिला नेले होते. वरंधा घाटात ते दुपारी अडीचच्या सुमारास थांबले. त्या वेळी छायाचित्र काढण्यासाठी म्हणून सुनीताला उभे केल्यानंतर विक्रमने तिला दरीमध्ये ढकलून दिले
 
विक्रम हा मांजरी येथील एका कंपनीत पर्यवेक्षक म्हणून कामाला आहे. सुनीताच्या चारित्र्यावर तो संशय घेत असे. तसेच माहेरहून पैसे आणावेत यासाठी विक्रम व त्याचे आई, वडील सुनीताचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होते. या त्रासाला कंटाळून सुनीता दहा दिवसांपूर्वी माहेरी राहायला गेली होती. मात्र काटा काढण्यासाठी फिरायला जाण्याचे सांगून बहाणा केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
पुणे व्हेंचर्स या गिर्यारोहण संस्थेच्या मदतीने दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर रविवारी रात्री उशिरा ६०० फूट दरीतून सुनीताचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर विक्रमसह त्याची आई अलका शंकर शेवते (४८) आणि वडील शंकर शेवते (६१) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
 
 

First Published: Tuesday, July 17, 2012, 11:28


comments powered by Disqus