Last Updated: Thursday, July 19, 2012, 08:54
www.24taas.com, पुणे पुण्याचं पाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत पेटलंय. पुण्याचं पाणी दौंडला सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर स्थानिक आमदारांनी अजित पवारांविरोधात रोष व्यक्त केला. खडकवासलामध्ये सध्या दोन टीएमसी पाणी आहे. त्यातलं अर्धा टीएमसी पाणी दौंडला सोडण्यात येणार आहे. या निर्णयाला राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांचा विरोध आहे. हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. हा निर्णय रद्द झाला नाही तर आंदोलनाचा इशारा पुण्यातल्या आमदारांनी दिलाय.
कुठं 'मुरतंय' पुण्याचं पाणी...अखेर पुण्याचं पाणी दौंडला सोडण्यात आलंच. खासदार सुरेश कलमाडी हे पाणी अडवू शकले नाहीत. मात्र हा झाला राजकारणाचा भाग... टंचाईच्या परिस्थितीत आहे तेवढं पाणी वाटून घ्यायला पुणेकर तयार आहेत. सध्या धरणांत फक्त दोन टीएमसी पाणी आहे. त्यापैकी अर्धा टीएमसी पाणी दौंडला दिलंय. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढलीय. पुण्यात सध्या २० ते ३० टक्के पाणीकपात सुरु आहे. अशा परिस्थितीत पुढचा विचार करून आणखी पाणीकपात सोसण्याची त्यांची तयारी आहे. पाऊस होत नाही तोवर ही कपात वाढवून दिवसाआड पाणीपुरवठा स्वीकारण्याची तयारी पुणेकरांनी दाखवलीय. मात्र, महापालिकेच्या दोषयुक्त वितरण व्यवस्थेमुळं तेही म्हणजेच दिवसाआड पाणीपुरवठा करणं शक्य नाही.
पुण्याची पाणी पुरवठा यंत्रणा अनेक वर्षं जुनी आहे. वाढती लोकसंख्या तसेच तांत्रिक अडचणींचा विचार त्यात केलेला नाही. ही संपूर्ण यंत्रणा बदलण्यची फक्त चर्चाच गेली अनेक वर्षं सुरु आहे.
.
First Published: Thursday, July 19, 2012, 08:54