Last Updated: Friday, December 16, 2011, 13:00
झी २४ तास वेब टीम,कोल्हापूर कोल्हापुरातल्या पन्हाळ्याच्या सौंदर्यात आता आणखी भर पडणार आहे. कारण वीर काशीद समाधीच्या ठिकाणी मावळ्यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत. सध्या या पुतळ्यांवरुन अंतिम हात फिरवण्याचं काम सुरू आहे. यामुळे पर्यटनात वाढ होणार असुन पन्हाळ्याची शानही वाढणार आहे.
मावळ्यांचे १२ पुतळे पन्हाळगडाची शान वाढवणार आहेत. जे.जे स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतलेल्या प्रशांत मयेकर यांनी हे मावळे तयार केलेत.मयेकर यांचा शिल्पकलेतला ४० वर्षांचा अनुभव आहे. मावळ्याचा एक पुतळा तयार करण्यासाठी ३५ ते ४० हजार खर्च आणि २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागल्याचं मयेकरांनी सांगितलं. हे पुतळे वीर शिवा काशीद समाधी परिसरात लावले जाणार आहेत.
चेहऱ्यावरील राकट व कणखर भाव आणि कलात्मकतेमुळे हे पुतळे लक्षवेधी ठरतील. तसंच या पुतळ्यांमुळे गडाला एक वैशिष्टपूर्ण लूक मिळणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या मावळ्यांमुळे पन्हाळ्याला नवी ओळख मिळेल तसंच वीर शिवा काशीद आणि बाजीप्रभुंच्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही अशीच भावना व्यक्त होतेय.
First Published: Friday, December 16, 2011, 13:00