Last Updated: Wednesday, July 25, 2012, 23:06
www.24taas.com, पुणे सरकारी शाळांमध्ये जाणा-या विद्यार्थ्यांबद्दल महत्त्वाची बातमी. विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार प्रत्यक्षात पोषक नसून उलट आरोग्यासाठी घातकच आहे. पुण्यात हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय. पुण्यातल्या एका शाळेत ९ पैकी तब्बल ७ दिवस निकृष्ट दर्जाचा आहार मुलांना देण्यात आलाय. शाळेनंच तसा अहवाल दिलाय. या आहारात चक्क अळ्या आढळल्यात.
पुणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मधल्या शालेय पोषण आहाराचा हा अहवाल आहे. २ जुलै ते ११ जुलै या ९ दिवसांमध्ये मुलांना देण्यात आलेल्या आहाराबाबतचा अभिप्राय या ठिकाणी देण्यात आलाय. त्यानुसार कधी तिखट, कधी खारट, कधी अळणी तर कधी जेवणात अळी सापडल्याची नोंद त्यात करण्यात आलीय. वैदुवाडी परिसरातली ही शाळा आहे. इथल्या चिमुकल्यांच्या आरोग्याशी हा खेळ सुरु आहे.
मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याची नेहमीचीच तक्रार आहे. पालकांनी वेळोवेळी मागणी करूनही त्यामध्ये सुधारणा होत नाही. रामदेव बाबा बचत गटाच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. या गटाचे काम समाधानकारक नसल्याचा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांनी महापालिकेच्या शिक्षण प्रमुखांकडे पाठवलाय. पुढे काय कारवाई झाली हे इथल्या शिक्षकांनाही माहिती नाही.सरकारी शाळांमधून मुलांना दिल्या जाणा-या माध्यान्ह भोजनाचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. सरकारचे कोट्यावधी रुपये या योजनेवर खर्च होतायत. त्या बदल्यात सुरू आहे तो छोट्या मुलांच्या आरोग्याशी खेळ.
First Published: Wednesday, July 25, 2012, 23:06