नगरसेवकानेच केली अवैध वृक्षतोड - Marathi News 24taas.com

नगरसेवकानेच केली अवैध वृक्षतोड

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
 
पुण्यातल्या वारजेमध्ये उघडकीला आलेल्या अवैध वृक्षतोडी प्रकरणी महापालिकेनं कडक कारवाईच्या दिशेने पावलं उचलली आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी झाडांचं रक्षण करावं अशा रक्षकांनीच झाडांची कत्तल केली आहे.
 
अवैध वृक्ष तोड किंवा महापालिका हद्दीतले अवैध प्रकार रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्या नगरसेवकांनीच झाडांची कत्तल केल्याचं उघड झालंय. शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्याच विरोधात तक्रार नोंदवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.  पृथ्वीराज सुतार यांच्याबरोबरच त्यांचे वडील माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्यावरही या प्रकरणी ठपका ठेवण्यात आलाय. शशिकांत आणि पृथ्वीराज यांच्याबरोबरच सुतार कुटुंबातल्या इतर चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातले प्रसिद्ध वकील सुधाकर आव्हाड यांनीही अवैध वृक्ष तोड केल्याचं महापालिकेनं म्हटलंय. आव्हाड यांच्या विरोधातही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणातल्या सर्व दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे. हा डोंगर काही दिवसांपूर्वी वनराईनं नटला होता. मात्र या ठिकाणी आता फक्त खड्डे आणि तोडलेल्या झाडांचे अवशेष उरले आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही वृक्षतोड झाली आहे, तो परिसर महापालिकेच्या बी.डी.पी. म्हणजे बायो डायव्हर्सिटीमध्ये येतो. त्यामुळे ही बाब अधिकच गंभीर झाली आहे.
 
 

First Published: Thursday, July 26, 2012, 21:07


comments powered by Disqus