जगभर पसरली 'सुंदर'ची दुर्दशा पसरली - Marathi News 24taas.com

जगभर पसरली 'सुंदर'ची दुर्दशा पसरली

www.24taas.com, कोल्हापूर
श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर इथल्या ‘सुंदर’ हत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ‘अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ या संस्थेनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सुंदर हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय.
 
दख्खनचा राजा ज्योतिबाच्या सेवेसाठी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी सुंदर हत्ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला भेट दिला होता. मात्र, या हत्तीची देखभाल देवस्थान समितीकडून व्यवस्थित होत नसल्याची तक्रार भक्तांनी केलीय. देवस्थान समितीला वेगवेगळ्या माध्यमातून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, तरीदेखील सुंदर हत्तीच्या पालन पोषणासाठी दिवसाला येणारा पाच हजार रुपयांचा खर्च देवस्थानला पेलवत नाही का? असा प्रश्न प्राणीमित्र आणि भक्तांना पडलाय. या प्रकरणाची दखल घेत ‘अॅऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ या संस्थेनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.
 
देवस्थान समितीनं मात्र ‘अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’नं दाखल केलेली तक्रार चुकीची असल्याचं म्हटलंय. पण प्रत्यक्षात त्याला लागणारा चांगल्या दर्जाचा चारा आणि औषधोपचार मिळत नसल्याचं दिसून आलंय. त्यामुळे सुंदर हत्तीची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून होत नसल्यास हत्तीची रवानगी प्राणी संग्रालयात करावी, अशी मागणी पुढं आलीय.
 
सुंदर हत्तीच्या दुर्दशेचं प्रकरण ‘पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल’ या संस्थेकडेही गेलंय. या संस्थेनं हे प्रकरण ब्रिटनचे संगीतकार पॉल मॅककार्टेनी यांना कळवलं. त्यानंतर पॉल यांनी वनमंत्री पतंगराव कदम यांच्याशी  पत्रव्यवहार करुन सुंदर हत्तीबाबत त्वरित लक्ष घालावं, अशी विनंती केली होती. त्यामुळं या सुंदर हत्तीच्या दुर्दशेची चर्चा जगभरात पोहचलीय.
 
.

First Published: Wednesday, August 1, 2012, 17:37


comments powered by Disqus