कुठे आहेत कोल्हापूरचे पैलवान? - Marathi News 24taas.com

कुठे आहेत कोल्हापूरचे पैलवान?

www.24taas.com, कोल्हापूर
ऑलिम्पिकमध्ये छोटे छोटे देश मोठी कामगिरी करुन मेडल्सची बरसात करत असतानाच भारताला मात्र एकेक पद मिळवण्याठी झगडावं लागतंय. त्यातही महाराष्ट्राची अवस्था अजूनच दयनीय. केवळ दोन प्लेअर वैयक्तिक खेळांत ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालेत. मराठमोळ्या कुस्तीतही...
 
कोल्हापूर... कुस्तीची पंढरी... अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पैलवान या नगरीनं दिलेत. मात्र, आता कोल्हापुरची हीच ओळख पुसली तर जाणार नाही ना? अशी भीती वाटण्याजोगी स्थिती आहे. महाराष्ट्राचा केवळ एक पैलवान ऑलिम्पिकसाठी जाऊ शकला. पण, कोल्हापूर या कुस्तीच्या पंढरीतून मात्र एकही पैलवान ऑलिम्पिकला जाऊ शकला नाही. इतक्यात तरी कोल्हापूरच्या एखाद्या पैलवानानं आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे कर्तृत्व केल्याचं ऐकीवात नाही. एकीकडे हरियाणासारखी छोटी राज्यं खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. तर महाराष्ट्र सरकारच्या खेळाडूंबाबातच्या उदासीन धोरणाचा फटका कोल्हापुरातल्या पैलवानांनाही बसतोय..
 
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसाठी केलेल्या अथक प्रयत्नामुळं उत्तरेकडील मल्लाचे ताफेच्या ताफे कोल्हापूरकडं यायचे. पण आता ही परीस्थिती बदलली आहे. कोल्हापूरचे अनेक मल्ल प्रशिक्षण घेण्यासाठी उत्तरेकडं धाव घेताना दिसतात. कोल्हापूरात 26 तालमी आहेत त्यापैकी फक्त 6 तालमीच सुरु आहेत. यामधील अनेक तालमीमध्ये मॅटवरील कुस्तीचा सराव  करण्यासाठी मॅटच उपलब्ध नाहीत. चांगला खुराक नाही, मग कोल्हापूरचे मल्ल ऑलिम्पिकसाठी कसे पात्र ठरणार प्रशिक्षकांनाही हाच सवाल सतावतोय.
 
महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं क्रिकेटच्या सर्वोच्च पदावर असताना क्रिकेटमधील पैसा देशी खेळांमध्ये देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आपल्या मातीतील खेळालाही पानंच पुसण्यात आलीत. त्यामुळेच की काय, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेली कुस्ती आता पोरकी झालीय.
 
.

First Published: Tuesday, August 7, 2012, 12:23


comments powered by Disqus