स्फोटकं निकामी करण्यास लष्कर 'दक्ष' - Marathi News 24taas.com

स्फोटकं निकामी करण्यास लष्कर 'दक्ष'

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
स्फोटकं निकामी करण्यासाठी आणि नष्ट करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'दक्ष' या अत्याधुनिक रोबोटिक यंत्राचा लष्करात समावेश करण्यात आलाय. आयईडी शोधण्यात 'दक्ष'चा हातखंडा आहे. पुण्यातल्या दिघीमधील रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट इस्टॅबलिशमेंट या संस्थेनं तयार केलेले २० दक्ष लष्कराला सुपूर्द करण्यात आले.
 
बॉम्ब नाशक पथकांसाठी संजीवनी ठरणारे रोबटीक मशीन 'दक्ष' हे नावाप्रमाणेच दक्ष असून आयईडी स्फोटकं शोधण्यात या यंत्राचा हातखंडा आहे. दक्ष लष्करात समावेश करण्यात आलाय. दक्ष मुळं स्फोटकं शोधताना आणि नष्ट करताना संभाव्य जिवीतहानीचा धोका कमी होणार आहे. पुण्याजवळच्या दिघीतील लष्कराच्या रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट इस्टॅबलिशमेंट या संस्थेनं दक्ष विकसित केलयं. रिमोटच्या सहाय्यानं दक्ष हाताळता येत. ५०० मीटरपर्यंत स्फोटकं शोधण्याची क्षमता दक्षमध्ये आहे.
 
 
दक्ष सीमेवर किंवा नागरी भागातील चिंचोळ्या इमारतींमधूनही स्फोटकं शोधू शकतो. इमारतींचे जीने चढणे, तीव्र उतारावरुन चालणे, तसच घर आणि वाहनांचे बंद दरवाजे उघडण्याची क्षमता दक्षमध्ये आहे. प्रसंगी पाण्याचा मारा करुन स्फोटकं निकामी करण्याचे तंत्रही दक्षमध्ये आहे.
 
 
भविष्यात दक्षला आणखी आधुनिक करण्यात येणार आहे. नाईट व्हिजन यंत्रणेमुळं रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारातही तो काम करण्यास सक्षम असेल. तसंच आण्विक हल्ला किंवा दुर्घटनेवेळीही त्याचा उपयोग करता येणार आहे. दक्षमुळं स्फोटकं शोधताना आणि निकामी करताना होणारी जिवितहानी अनेक पटींनी कमी करण्यात यश आलंय.

First Published: Tuesday, December 20, 2011, 15:30


comments powered by Disqus