Last Updated: Tuesday, December 27, 2011, 21:36
झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी 
सशक्त लोकपालसाठी अण्णांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो आहे. अण्णांचे राळेगणवासिय त्यांच्या पाठिशी भक्कमपणे आहेत. एकानं तर आपल्या मुलाचं नावच 'लोकपाल' ठेवल आहे. लोकपालवरुन देशभरात अक्षरशः रण पेटलं आहे. सशक्त लोकपाल आणा अशी मागणी अण्णा करत आहेत. पण चार महिन्यांपूर्वीच हा लोकपाल अवतरला आणि तोही चक्क अण्णांच्याच राळेगणसिद्धीत. ऑगस्टमध्ये अण्णांनी केलेल्या उपोषणाचा शेवट २७ ऑगस्टला झाला.
अण्णांपुढे सरकार नमलं आणि जनतेचा विजय झाला. याच मुहूर्तावर म्हणजेच २७ ऑगस्टला राळेगणसिद्धीमध्ये एका बाळाचा जन्म झाला. आणि याचंच निमित्त साधत त्याचं नाव 'लोकपाल' असं ठेवण्यात आलं. आज हे बाळ चार महिन्यांचं झालं आहे. त्याचे वडील दादा पठारे हे अण्णांबरोबर त्यांच्या आंदोलनाला उपस्थित असतात.
२७ ऑगस्टला त्यांना मुलगा झाल्याचं कळल्यावर त्यांनी अण्णांना सांगितलं. आणि अण्णांनी त्याचं नाव लोकपालच ठेवा असं म्हणत त्याचं नामकरण करुन टाकलं. त्यामुळे आता हा लोकपाल अण्णांच्या राळेगणसिद्धीतच वाढतो आहे. अण्णांच्या आंदोलनाचा प्रभाव देशभर आहे. सशक्त लोकपालसाठी अण्णांच्या संघर्षाला तरुणाईचा मोठा पाठिंबा आहे. त्यातच अण्णांचे गावकरी त्यांच्या पाठिशी मोठ्या संख्येनं आहेत.
First Published: Tuesday, December 27, 2011, 21:36