Last Updated: Friday, October 14, 2011, 11:34
झी २४ तास वेब टीम, सातारा सातारा जिल्हा प्रशासनानं लेक लाडकी अभियानांतर्गत नकुसा नावाच्या २६२ मुलींचं नामकरण केलं गेलं.
राज्यातच नाही तर देशभरात या उपक्रमामुळं मुली वाचवा असा संदेश जाईल आणि मुलींचं प्रमाण वाढेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय. कडक कायद्यांनतरही स्त्री भ्रूण हत्येत होणारी वाढ ही मोठी समस्या आहे. यासाठी सामाजिक संघटना आणि प्रशासन वेगवेगळे कार्यक्रम राबवतंय. याचा चांगला परिणाम सातारा जिल्ह्यात दिसला.

२००१ च्या तुलनेत २०११ मध्ये साता-यात मुलींचं प्रमाण वाढलंय. मुलगी झाली तर तिचं नाव नकुसा ठेवलं जातं. यामुळं नकुसांमध्येही न्यूनगंड निर्माण होतो. त्यामुळं लेक लाडकी अभियानांतर्गत २६२ नकुसांचा नामकरण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसेल असं मत सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केलं.
केंद्रीय समितीनं सातारा जिल्हात लेक लाडकी अभियानांतर्गत केलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केलंय. पालकांपुढेच या नकुसांचं नामकरण करून त्यांच्या आवडीची नाव त्यांना देण्यात आली. प्रशासकिय आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधला समन्वय आणि इच्छा शक्तीच्या जोरावर स्त्री भ्रूण हत्येवर निश्चितच मात करता येईल, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी व्यक्त केलं.
First Published: Friday, October 14, 2011, 11:34