इंदापूर अर्बन बँकेत सावळागोंधळ - Marathi News 24taas.com

इंदापूर अर्बन बँकेत सावळागोंधळ

www.24taas.com, इंदापूर 
 
इंदापूर अर्बन बँकेमध्ये राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतला सावळागोंधळ उघड झाला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना निधीत इंदापूरमधल्या एका शेतकऱ्याला घरदुरुस्तीचेकर्जमाफ करण्यात आलं आहे. चंद्रकांत चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव आहे. २००९ सालात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणलेल्या कर्जमाफी योजनेत वीस हजार रुपये कर्जमाफ करण्यात आलं होतं.
 
मात्र त्यासाठी संबंधित शेतकऱ्याला केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेचा फायदा मिळालेला नसावा आणि फक्त ते कृषीकर्ज असावे अशा अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र अशा परिस्थितीतही चव्हाण या शेतकऱ्याचं चक्क घरदुरुस्तीचं कर्ज माफ झालं आहे. त्यांना केंद्र सरकारच्या योजनेत कर्जमाफी मिळालेली असतानाही घरदुरुस्ती कर्जमाफ करण्यात आलं आहे. मात्र चव्हाण यांनी ही नियमबाह्य कर्जमाफी नाकारली आहे. बॅकेनं हा व्यवहार परस्पर केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
याबाबतची कागदपत्रं मिळावीत यासाठी चव्हाण सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. मात्र बँकेकडून कोणत्याही प्रकारची दाद मिळत नसल्याचा आरोप या शेतकऱ्यानं केला आहे. अशाप्रकारे कर्जमाफीचे गैरप्रकार बँकेत मोठ्या प्रमाणात घडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

First Published: Wednesday, January 4, 2012, 18:25


comments powered by Disqus