महापौर बहल यांची पुन्हा 'कोंबडी पळाली' - Marathi News 24taas.com

महापौर बहल यांची पुन्हा 'कोंबडी पळाली'

www.24taas.com, पुणे
 
'कोंबडी पळाली' गाण्यावर थिरकणारे पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल पुन्हा अडचणीत आले आहेत. महिला बचत गटांच्या नावाखाली अनुदान लाटण्याच्या प्रकरणात महापौरांचाही समावेश असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेनं केला आहे.
 
बचत गटांना महापालिकेकडून मिळणारं अनुदान लाटण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या काही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी चार बचत गटांची स्थापना केली. या बचत गटांना प्रत्येकी तीस लाख रुपये अनुदान देण्यात आलं. प्रत्यक्षात हे बचत गट कधी स्थापनच झाले नाहीत. या बचतगटांसाठी पॉलिमरची पोती तयार करणाऱ्या मशीन्सचं कंत्राट ‘सुमेध पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आलं. या कंपनीनं अव्वाच्या सवा भावानं ही मशीनरी विकल्याचा आरोप आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या काळात महापौर योगेश बहल हे या कंपनीचे संस्थापक असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे.
 
दुसरीकडे महापौरांनी शिवसेनेचे हे आरोप फेटाळून लावलेत. आम्ही कंपनी स्थापन करणार होतो. पण ती केली नाही, असं महापौरांचं म्हणणं आहे.
 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं महापौरांवर हे आरोप केलेत. त्यासाठी त्यांनी माहिती अधिकाराचा आधार घेतला आहे. महापौरांवरच्या या आरोपांनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 

 
 

First Published: Thursday, January 12, 2012, 00:02


comments powered by Disqus