बालाजी - महालक्ष्मीचा १००वा कल्याणोत्सव - Marathi News 24taas.com

बालाजी - महालक्ष्मीचा १००वा कल्याणोत्सव

दीपक शिंदे, www.24taas.com, कोल्हापूर
 
कोल्हापूरात बालाजी आणि महालक्ष्मीचा १००वा कल्याणोत्सव अर्थात विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देशातल्या काही शहरांमध्ये हा कल्याणोत्सव आयोजित केला जातो. त्यापैकी हा १००वा सोहळा असल्यानं या कल्याणोत्सवाला लोकांनी मोठी गर्दी केली होती.
 
कल्याणोत्सव अर्थात दैवी विवाहसोहळा. तिरुपती इथं दररोज होणारा हा सोहळा कोल्हापूरकरांना साक्षात अनुभवायला मिळाला. हे सर्व विधी खास तिरुपतीच्या पुजारी आणि वेदपंडितांनी पारंपरिक पद्धतीनं केले. कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि तिरुपतीच्या बालाजीचे हे ऋणानुबंध जपणाऱ्या १००व्या कल्याणोत्सवाला कोल्हापूरच्या दृष्टीनं विशेष महत्त्व आहे. डी वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं या सोहळ्याचं नेटकं संयोजन करण्यात आलं होतं.
 
या सोहळ्यासाठी तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष स्वतः उपस्थित होते, तर या सोहळ्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या भाविकांमुळे ग्राऊंड पूर्णपणे भरून गेले होते. कोल्हापूरात हा सोहळा होताना पाहताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिय़ा तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षांनी दिली. एकूणच या दैवी विवाहसोहळ्यामुळे कोल्हापूरकरांना तिरुपती देवस्थानला जाऊन आल्याचा अनुभव मिळत होता. तर या सोहळ्यानंतर या दोन्ही देवस्थानांमधलं नातं वृद्धिंगत होईल यात शंका नाही.
 

First Published: Sunday, January 22, 2012, 14:28


comments powered by Disqus