चोरांचा मैत्रीला 'शिरच्छेद' - Marathi News 24taas.com

चोरांचा मैत्रीला 'शिरच्छेद'

अरुण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे
 
चोरून आणलेल्या मालाच्या विभागणीवरून झालेल्या वादात एकाचं मुंडकं छाटण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. अर्जुन अलाप्पा पुजारी असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या हडपसर भागात ही घटना घडली.
 
अर्जुन अल्लाप्पा पुजारी याचा रोहित इरा मुद्गल आणि महेश गोविंदाप्पा बोवी या त्याच्याच दोन साथीदारांनी निर्घृण हत्या केली. अर्जुनचं शीर त्यांनी धडापासून वेगळं करत क्रूरपणाचा कळस गाठला. २५ जानेवारीच्या सकाळी एक अनोळखी मृतदेह एका नाल्यात आढळून आला. या मृतदेहाचं शीर मात्र गायब होतं. त्याचवेळी अर्जून पुजारी हा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी दिली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो अर्जुनचाच असल्याचं स्पष्ट झालं. धक्कादायक बाब म्हणजे अर्जून बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या त्याच्या या दोन मित्रांनीच अर्जूनची हत्या केल्याचं उघड झालं.
 
अर्जुन आणि त्याचे हे दोन मित्र असे तिघेही जण पाकिटमारी तसंच मोबाईल चोरी करायचे. चोरून आणलेल्या मुद्देमालाच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाला आणि या वादातूनच अर्जूनचा खून करण्यात आला. या दोन्ही आरोपींना ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First Published: Friday, January 27, 2012, 20:57


comments powered by Disqus