पुण्यामध्ये गुंडांचं जळीतकांड - Marathi News 24taas.com

पुण्यामध्ये गुंडांचं जळीतकांड

अरुण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे
 
पुण्याच्या धनकवडी परिसरात शुक्रवारी रात्री एक भयानक जळीतकांड घडलं. इथल्या गुलाब नगरमधील 'टॉरटॉईज क्लॉथ्स' नावाच्या दुकानावर १० ते १२ हत्यारबंद गुंडानी हल्ला केला. या गुंडांनी हे दुकान पेट्रोल टाकून पेटवून दिलं. घटना घडली तेव्हा दुकानाची मालकीण, तिचा मुलगा अनिष तसंच त्याचे मित्र स्वप्निल आणि सनी मोरे असे चौघे होते. अनिशची आई दुकानातून कशीबशी बाहेर पडली. मात्र, इतर तिघे दुकानातच अडकले.
 
ही घटना घडताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या परिसरात गेले वर्षभर सुरू असलेल्या गँगवॉरमधून ही घटना घडली. यातूनच २१ ऑक्टोबर २०११ रोजी बिजू नवघणे या गुंडाची दत्ता माने गँगनं हत्या केली होती. परिसरातील सामान्य नागरिकांच्या गाड्याही यावेळी फोडण्यात आल्या होत्या. नवघनेच्या हत्येचा बदला म्हणून दत्ता मानेचा मेव्हणा ज्ञानेश्वर जाधवची ११ जानेवारी २०१२ला हत्या करण्यात आली. त्याचीच पुढची कडी म्हणजे शुक्रवारचं जळीतकांड होय. मागील वर्षी देवीच्या तोरण मिरवणुकीदरम्यान माने आणि नवघणे गँगमध्ये दंगल झाली होती.
 
या घटनेतील मयत अनिश हा त्या घटनेतील आरोपी आहे. तो नवघणे गँगशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. या घटनेनंतर धनकवडी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. ठिकठिराणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या जळीतकांडामुळं पुणेकरांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. गुंडगिरी मोडून काढण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याची नागरिकांची भावना आहे.त्यामुळे पोलीस करतात तरी काय असा प्रश्न आज विचारला जात आहे.
 
 

First Published: Saturday, January 28, 2012, 17:31


comments powered by Disqus