Last Updated: Tuesday, January 31, 2012, 21:18
नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे महापालिकेच्या क्रीडा स्पर्धांसाठी काही नगरसेवकांनी बूट खरेदी केली आणि तीही तब्बल साडे सहा लाख रुपयांची. त्याचा भुर्दंड अर्थातच पुणेकरांना बसणार आहे.महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांसाठी नगरसेवकांनी तब्बल साडे सहा लाखांचे बूट खरेदी केले आहेत. पाच हजार रुपयांपासून ते तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत एका बूटाच्या जोडीची किंमत होती. ही सगळी खरेदी कॅम्पमधल्या एकाच दुकानातून करण्यात आली, त्यासाठी ना कुठली निविदा काढण्यात आली, ना कुठले नियम पाळण्यात आले.
स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर, भाजप गटनेत्या मुक्ता टिळक, मनसे गटनेते रवींद्र धंगेकर, वीरेंद्र किराड, राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील, बाळासाहेब बोडके, भाजपच्या मेधा कुलकर्णी, सुनिता चिंतल, शिवसेनेचे विजय देशमुख आणि अशोक हरणाव या नगरसेवकांनी पुणेकरांच्या पैशातून लाखो रुपयांचे जोडे खरेदी केली. आता या सगळ्यांनीच कानावर हात ठेवले आहेत. महापौरांनीही याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम पेटला असल्यानं ही जोडे खरेदी करणारे नगरसेवक यावर जास्त बोलायला तयार नाहीत आणि लाखोंची बिलं मंजूर करणारं प्रशासनही मुग गिळून गप्प आहे. यात पुणेकरांच्या पैशांचा मात्र चुराडा झाला आहे.
First Published: Tuesday, January 31, 2012, 21:18