Last Updated: Friday, February 10, 2012, 17:45
www.24taas.com, पुणे पुण्यात काँग्रेसचा स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनाच नाहीय. त्यामुळे त्यांनी निवडणुकीआधीच आघाडीची भाषा सुरू केलीय. पण त्याचबरोबर अर्थखातं कुणाच्याही ताब्यात असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय काहीच होत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना लगावला आहे.
पुण्यात निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आघाडीची भाषा सुरू केलीय. पुण्यात पूर्ण बहुमत मिळण्याबद्दल काँग्रेस साशंक आहे. त्यामुळे समविचारी पक्षांबरोबर युती करु, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुण्यात निवडणुकीनंतर आघाडीचे संकेत दिलेत. तसंच मेट्रो रेल्वे आणि एलिव्हेटेड रेल्वेबद्दलही मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका बदलत अजित पवारांच्या सूरात सूर मिसळलाय. पुण्यात बीआरटी प्रकल्प यशस्वीपणे राबवण्याबरोबरच पुणे मेट्रो प्रकल्पाला गती देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुण्याचं पुणेपण टिकवण्यासाठी काँग्रेसला पूर्ण सत्ता देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
पुण्यात मुख्यमंत्र्यांनीही आज रोड शो केला. पुण्याचं पुणेरीपण टिकवून ठेवणार, असंही मुख्यमंत्र्यांनी पुण्यात म्हंटलंय. गेले दोन दिवस अजित पवारांनी रोड शो करत पुणं पिंजून काढलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी रोड शो करत पुणेकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कलमाडी तिहार मुक्कामी गेल्यानंतर पुण्यात काँग्रेसला नेतृत्व उरलं नव्हतं. त्यामुळे पुणे काँग्रेसला मरगळ आली होती. कलमाडी पुन्हा पुण्यात परतले असले तरी त्यांना निव़डणुकीपासून दूर ठेवण्याचाच काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुणे काँग्रेसची मरगळ झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी रोड शोच्या माध्यमातून केला.
.
First Published: Friday, February 10, 2012, 17:45