पुण्यात पुन्हा एकदा गाडी पळवली? - Marathi News 24taas.com

पुण्यात पुन्हा एकदा गाडी पळवली?

www.24taas.com, पुणे
 
भरधाव वेगानं एसटी चालवून स्थानिकांचा बळी घेणारा संतोष मानेचं कृत्य पुणेकर विसरले नसतानाच काल पुणेकरांना काही काळ अशाच घटनेची पुनरावृत्ती होते की काय ? अशी भीती निर्माण झाली होती. हमीद मिथ्थूभाई शेख या ५० वर्षाच्या इसमानं त्याची स्कॉर्पिओ गाडी खडकी ते पिंपरीच्या नेहरुनगर भागापर्यंत अत्यंत भरधाव वेगानं चालवली होती. त्यात त्यानं तीन दुचाकी स्वारांना उडवलं होतं.
 
शेखला पकडण्यासाठी पोलीस पाठलाग करत होते. सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालं नाही. दारुच्या नशेत गाडी चालवत असताना पोलीस पकडू नये यासाठी हमीद भरधाव गाडी चालवत असल्याचं नंतर स्पष्ट झालं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
 
पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी चालू आहे. दरम्यान मंगळवारी रात्री पुण्यातही कॅम्प परिसरात महात्मा गांधी रोडवर दारुच्या नशेत असलेल्या व्यक्तीनं त्याची इंडिगो गाडी नो एंट्रीमध्ये नेली आणि तीन गाड्यांना उडवलं. त्यात तीघेजण किरकोळ जखमी झाले. एकाच रात्रीत घडलेल्या या दोन घटनांमुळे प्रत्यक्षदर्शी पुणेकर मात्र काहीकाळ धास्तावले होते.
 
 

First Published: Wednesday, February 22, 2012, 15:10


comments powered by Disqus