रुग्णाचा मृत्यू, हॉस्पीटलमध्ये गोंधळ - Marathi News 24taas.com

रुग्णाचा मृत्यू, हॉस्पीटलमध्ये गोंधळ

www.24taas.com, सांगली
 
 
सांगलीच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पीटलमध्ये घुसून गोंधळ घातला. इतकच नाही तर आपला हलगर्जीपणा दडवण्यासाठी हॉस्पीटल प्रशासनाने त्या रुग्णाचा मृतदेह बेवारस दाखवला. याप्रकरणी डॉ. ललित मोहन आणि डॉ.प्राची निर्मळे या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.
 
 
सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये ही गर्दी आहे एका रुग्णाच्या नातेवाईकांची आणि त्याच्या गावक-यांची. सिव्हील हॉस्पीटलच्या अधिष्ठात्यांना त्यांनी घेराव घातला होता. कारणही तसच घडलं होतं. शांतीनगर परिसरात रहाणा-या अतिश घाडगेला गेल्या काही वर्षांपासून ह्रदयविकाराचा त्रास होता त्यामुळे त्याला दर महिन्यात इंजेक्शनसाठी हॉस्पीटलमध्ये जावं लागे. असाच इंजेक्शनसाठी तो आला असतांना त्याला चुकीचं इंजेक्शन दिल गेलं आणि त्याचा मृत्यू झाला. इतकच काय हॉस्पीटलचा हलगर्जीपणा लपवण्यासठी हॉस्पीटलने रुग्णाचा मृतदेह बेवारस ठरवला, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
 
 
सिव्हील सर्जन पांडुरंग बुरटे यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी घेराव घातल्यानंतर या प्रकरणी २ डॉक्टरांची चौकशी करुन ते दोषी आढळल्यास कारवाई करण्याचं आश्वासन अधिष्ठात्यांनी दिलं. नेमका त्या रुग्णाचा मृत्यू कसा झाला याचा उलगडा होईल. जर डॉक्टर दोषी आढळले तर कारवाईही होईल. पण जितकी काळजी डॉक्टरांनी आपल्या रुग्णावर उपचार करतांना घायला हवी तितकाच संयम रुग्णाच्या नातेवाईकांनीही ठेवायला हवा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
 
व्हिडिओ पाहा..

 

First Published: Friday, February 24, 2012, 13:39


comments powered by Disqus