Last Updated: Friday, February 24, 2012, 22:03
अरुण मेहत्रे, www.24taas.com, पुणे पुण्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी नेमकी कुणाची मदत घेणार याबाबतचा सस्पेन्स अजित पवारांनी कायम ठेवला आहे. एकीकडे काँग्रेससोबत बोलणी करणार असल्याचं सांगतानाच राष्ट्रवादीसमोर सगळे पर्याय खुले असल्याचंही अजित पवार म्हणत आहेत.
राष्ट्रवादीला पुण्याची एकहाती सत्ता हवी होती. पण पुणेकरांनी राष्ट्रवादीला बहुमतापासून दूरच ठेवलं. सत्तास्थापनेसाठी मॅजिक फिगर गाठण्यासाठी काँग्रेसची मदत घेणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. पण सत्तास्थापनेसाठी इतर पर्यायही खुले ठेवल्याचं सांगत अजित पवारांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. अजित पवारांचा हा डबल गेम आहे की दबावाचं राजकारण याची चर्चा सध्या सुरू आहे.
पुणे महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिकेत काम कसं करायचं, जनतेचे प्रश्न कसे मांडायचे, कसे सोडवायचे याच्या टिप्स अजित पवारांनी नवनियुक्त नगरसेवकांना दिल्या. इतकंच नाही तर कुठल्या कामात रस घ्यायचा आणि कुठल्या नाही, याबाबतही त्यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादीबरोबर कुठलाच पॅटर्न करणार नसल्याचं भाजप आणि शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठीचे डावपेच राष्ट्रवादीकडून खेळले जात आहेत. या सगळ्यात काँग्रेस मात्र अजूनही निरुत्साही असल्याचंच चित्र आहे.
First Published: Friday, February 24, 2012, 22:03