बारामती ठप्प, शरद पवार गप्प ! - Marathi News 24taas.com

बारामती ठप्प, शरद पवार गप्प !

झी २४ तास वेब टीम, बारामती
 
इंदापूर रस्त्यावरच्या काटेवाडी गावात बंद दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. काटेवाडी या शरद पवारांच्या गावातच हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, ऊस दरवाढीच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बारामती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळातोय.
 
बारामतीतल्या शेतकरी कृती समितीनं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बंदची हाक दिलीय. या बंदसाठी भाजप आणि शिवसेनेनंही आवाहन केल्यामुळं बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळं सहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बारामतीपाठोपाठ काटेवाडीतही बंद पुकारण्यात येणार आहे. बारामतीत सकाळीच मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली काटेवाडी बंदचं आवाहन करण्यासाठी काटेवाडीकडं रवाना झालीय. त्यामुळं आज जर ऊस दराबाबत तोडगा निघाला नाही तर आंदोलन जास्तच चिघळणार असल्याचं दिसतंय.
 
दरम्यान, राज्य सरकार ऊस दराववरून शेतक-यांना झुलवत ठेवत असल्याला आरोप राजू शेट्टींनी केलाय. सरकारला ऊस दराचा प्रश्न सोडवण्यात रस नसून या प्रश्नावर सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ऊस दरवाढीच्या प्रश्नावर विरोधक एकत्र झाले आहेत.
 
राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेकडून नाशिक-पुणे हासवेवर रास्तारोको करण्यात आला. या आंदोनलामुळं हायवेवरील दोन्ही बाजुची वाहतूक काही तास ठप्प झाली होती. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून मनसे आमदार वसंत गितेंसह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ऊस दरवाढीच्या मुद्यावर राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको सुरू आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूकीवर परिणाम झाल्याचं दिसून येतोय.
 
ऊस दरवाढीसाठी पुकारलेल्या राजू शेट्टींच्या आंदोलनाला शेतकरी नेते आणि भाजपचे आमदार पाशा पटेल यांनीही पाठिंबा दिलाय. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात आंदोलनाला एवढा पाठिंबा मिळत असेल तर नेत्यांनी वेळीच सावध व्हायला हवे असा इशाराही पटेल यांनी दिलाय.
 
दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन भेट घेतली. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांत १५ मिनिटे चर्चा झाली मात्र या बैठकीत नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र सध्या राज्य़ात सुरु असलेल्या ऊस दरवाढीच्या मुद्यांवर या दोघांत चर्चा झाल्याची शक्यता आहे. ऊस दरवाढीचा प्रश्न चांगलाच पेटलाय त्यामुळे याप्रश्नांवर तोडगा काढण्यासाठीच ही भेट झाल्याचं बोललं जातय.

First Published: Thursday, November 10, 2011, 08:44


comments powered by Disqus