तुकाराम बीज सोहळ्यात आसमंत दुमदुमुला - Marathi News 24taas.com

तुकाराम बीज सोहळ्यात आसमंत दुमदुमुला

www.24taas.com, पुणे
 
देहूमध्ये लाखो भक्तांच्या साक्षीनं आज तुकाराम बीज सोहळा मोठ्या भक्तीभावानं पार पडला. टाळ-मृदंग आणि भजन-कीर्तन आणि हरिनामाच्या जयघोषानं सारा आसमंत दुमदुमून निघाला.
 
 
तुकाराम बीज सोहळ्याच्या निमित्तानं देहूनगरी लाखो भक्तांच्या साक्षीनं अशी फुलून गेली होती. तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचा दिवस बीज सोहळा म्हणून साजरा केला जातो. यंदाचा ३६३ वा बीज सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. पांडूरंगाच्या मुख्य मंदिरातील आणि तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरातील दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या.
 
 
काकड आरतीनं बीज सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर  विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तसंच संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात महापूजा करण्यात आली. महापूजेनंतर पालखीचं मुख्यमंदिरातून टाळकरी, सनई चौघडे, शिंगवाले, ताशे, नगारे,जरीपटक्यांसह मोठ्या लवाजम्यासमवेत वैकुंठगमन मंदिराकडे प्रस्थान करण्यात आलं. देहूनगरीत जमलेल्या लाखो भाविकांनी यावेळी तुकोबांचा जयघोष केला आणि पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे रवाना झाली. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं. देहू नगरी टाळ-मृदंगाच्या साथीनं भजन-कीर्तन आणि हरिनामाच्या जयघोषानं  दुमदुमून गेली.

First Published: Saturday, March 10, 2012, 21:47


comments powered by Disqus