ऊस दरवाढीचा तिढा सुटणार? - Marathi News 24taas.com

ऊस दरवाढीचा तिढा सुटणार?

झी २४ तास वेब टीम, बारामती
 
ऊस दरवाढीचा तिढा सुटणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पवारांना मध्यस्थीची विनंती केल्यामुळं पवारांनी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सरकारनं ऊसाला २०५० रुपये दर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना २२०० रुपयांवर ठाम आहे. मात्र या चर्चेमुळं तोडगा निघण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
दरम्यान, ऊस दरवाढीसाठी सांगली-नांद्रे रस्त्यावर केलेल्या रास्तारोको झाला. यात  पोलिसांकडून आंदोलक शेतक-यांवर लाठीमार करण्यात आला.. त्यामुळं संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली. शांततेनं सुरु असलेल्या आंदोलनावर अचानक लाठीमार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळं या परिसरात तणावाचं वातावरण पसरलंय.
 
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचलेत. यावेळी चार ते पाच आंदोलक जखमीही झालेत. तर या रस्त्यावरची वाहतूकही ठप्प झाली. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतक-यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसंच आज निर्णय झाला नाही तर उद्यापासून तीव्र आदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे.

First Published: Friday, November 11, 2011, 15:16


comments powered by Disqus