NCP- राज्यसभेसाठी वंदना चव्हाण,आदिक - Marathi News 24taas.com

NCP- राज्यसभेसाठी वंदना चव्हाण,आदिक

www.24taas.com, पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यसभेसाठी पुणे शहराध्यक्षा वंदना चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्या नावाची निश्चिती केलीय. वंदना चव्हाण या पुण्याच्या माजी महापौर असून शहराध्यक्षा आहेत.
 
उच्च विद्याविभूषीत असलेल्या वंदना चव्हाण यांना विधान परिषदेत आमदारकीचा थोडा कालावधी मिळाला. त्यामुळं आता राज्यसभेवर संधी देण्यात आलीय. काँग्रेसकडून महापौर राहिलेल्या चव्हाण काही वर्षांपुर्वी पक्षात आल्या. तर गोविंदराव आदिक पक्षाचे ज्येष्ठ नेते असून पक्षाच्या कामगार संघटनांची जबाबदारी आहे.
 
राज्यसभेच्या रिक्त होणा-या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. त्यांच्या नावासाठी स्वत: 'साहेब' आग्रही असल्याची जोरदार चर्चा होती. राज्यसभेच्या राज्यातील सहा जागा रिक्त होत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव आदिक आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या जागांचा समावेश आहे. राज्यसभेसाठी यावेळी दोनही नवे चेहरे देण्याचा मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होता. त्यातील गोविंदराव आदिक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर राज्यसभेसाठी काट बसली आहे.
 
पवार यांचे एकेकाळचे टीकाकार गोविंदराव आदिक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर राष्ट्रवादीने त्यांना आपलेसे केले. तसेच राज्यसभा देऊन त्यांचे पुनर्वसनही केले. मात्र आदिक यांना यावेळी 'रिपिट' करण्यास पक्षातील काही मंडळींचा विरोध असल्याची चर्चा होता. मात्र, हा विरोध डावलून आदिक यांनी पुन्ह उमेदवारी देण्यात आली आहे. चव्हाण यांना विधान परिषदेवर अवघ्या काही महिन्यांसाठी पाठविले गेले होते. त्यांची मुदत सहा महिन्यांत संपल्यावर 'दादा'समर्थक अनिल भोसले यांना विधान परिषदेवर पाठविण्यात आले. चव्हाण यांना शहराध्यक्षपद देऊन पुनर्वसन केले असले तरी त्यांना राज्यसभा देण्याबाबत विचार केला जात होता. त्यामुळे यावेळी तरी चव्हाण यांची राज्यसभेसाठी वर्णी लागणार हे निश्चित होते.
 
पुण्यातून बांधकाम व्यावसायिक संजय काकडे हे अपक्ष राज्यसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांशी संधान साधले आहे. याशिवाय शेकापचे जयंत पाटील, हितेंद ठाकूर, विनय कोरे यांच्या ते संपर्कात आहेत. एकीकडे अपक्ष लढताना राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी मिळविण्याच्याही प्रयत्नात ते असल्याचे समजते.
 
राज्यसभेवरील निवडीसाठी ४२ आमदारांच्या मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे ६२ आमदार आणि ११ अपक्ष आहेत. या मतांच्या जोरावर राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. दुसऱ्या उमेदवाराच्या निवडीसाठी मात्र त्यांना झगडावे लागेल अशी चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुसऱ्या निवडीसाठी 'तगडा' उमेदवार दिल्यास ते ही जागा खेचून आणू शकतात अशीही चर्चा आहे

First Published: Thursday, March 15, 2012, 18:43


comments powered by Disqus