महाराज हे सरकार हातावर तुरी देणार - Marathi News 24taas.com

महाराज हे सरकार हातावर तुरी देणार

www.24taas.com, सातारा
 
अजिंक्यतारा किल्ल्याच्या डागडुजीसाठी १० कोटींचा विकासनिधी राज्य सरकारनं मंजूर केला होता. चार वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्र्यांनी घोषणा करुनही निधी अद्याप कागदावरच असल्यानं सातारकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
अजिंक्यतारा किल्ल्याला आठ शतकांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज ५६ दिवस या किल्ल्यावर राहिले होते. त्यानंतर चार राजांचे राज्यभिषेक या किल्ल्यावर झाले. अनेक ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. ३,३०० फूट लांब आणि १८०० फूट रुंद असलेला हा किल्ला आजमितीस मोडकळीस आला आहे. सातारा शहराला तीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी १० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केला होता.
 
त्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यताही मिळाली. मात्र चार वर्ष उलटूनही हा निधी अद्याप कागदावरच आहे. तर सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणे बंद करा, असं सडेतोड मत सातारकरांनी व्यक्त केलं आहे. याप्रकरणी छत्रपतींचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता त्यांनी पाठपुरावा करु, असं सांगितलं आहे.
 
मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातले असल्यानं यंदा तरी हा निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.चारशे कोटींचं शिवस्मारक उभारण्याचं आश्वासन देणाऱ्या आघाडी सरकारकडून किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
 
 
 

First Published: Wednesday, March 21, 2012, 14:12


comments powered by Disqus