Last Updated: Saturday, March 24, 2012, 22:08
www.24taas.com, पुणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाढत चाललेलं वितुष्ट वाढल्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वाढली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. राष्ट्रवादीने आपलं चिन्ह बदलून ‘खंजीर’ करावं, असं ते म्हणाले होते. एकुण काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या टीकेचा शरद पवार यांनी आज समाचार घेतला. शिस्त फक्त राष्ट्रवादीनेच पाळायची हे बरोबर नाही, काँग्रेसनेच कधी युतीधर्म पाळला नाही. यापुढे वाद वाढल्यास स्वस्थ बसणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.
पवारांच्या या वक्तव्याला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. पुढच्या निवडणूकीत आघाडी ठेवायची की नाही याचा विचार करु, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत विदर्भात राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी युतीशी हातमिळवणी केल्यानं काँग्रेस संतापलीय. त्यामुळं आगामी पाच महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं काँग्रेसनं जाहीर केलंय. शरद पवारांनी काँग्रेसला उत्तर दिल्यावर पुन्हा प्रतित्युत्तर काँग्रेसकडून देण्यात आलय. त्यामुळं हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
First Published: Saturday, March 24, 2012, 22:08