शिर्डी संस्थान प्रवास ३२०० रू. ते ४१५ कोटी - Marathi News 24taas.com

शिर्डी संस्थान प्रवास ३२०० रू. ते ४१५ कोटी

www.24taas.com, शिर्डी
 
रामनवमी उत्सवादरम्यान शिर्डीच्या साई मंदिरातल्या दानपेटीत 3 कोटी 30 लाख रुपये जमा झाले आहेत. हे पैसे किती जमा झाले आणि संस्थान कशावर खर्च करते हा प्रश्न नेहमीच वादाचा राहिलेला आहे.
 
शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत रामनवमी उत्सव काळात तब्बल तीन कोटी 30 लाख रुपये जमा झाले आहेत. संस्थानच्या उत्पन्नात दरवर्षी भरघोस वाढ होताना दिसते आहे. साई संस्थानची स्थापना 1922 साली झाल्यानंतर 1923 साली पहिला वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला.
 
त्यावेळी संस्थानचं वार्षिक उत्पन्न केवळ 3200 रुपये इतकं होतं. एप्रिल 2005 मध्ये संस्थानाचं उत्पन्न 86 कोटी, 2008 मध्ये 193 कोटींवर पोहचलं. गेल्या चार वर्षांत संस्थानचं उत्पन्न दोनशे कोटींनी वाढून यावर्षी 415 कोटी झालं आहे. तर खर्च 275 कोटी इतका झाला आहे.
 
साई संस्थानकडे सध्या 300 किलो सोनं, 3 हजार किलो चांदी जमा आहे. तंसच विविध बँका, रोखे मिळून 627 कोटींची गुंतवणूक आहे. या उत्पन्नातून साई संस्थान प्रामुख्यानं भक्तांसाठी चालवलं जाणारं प्रसादालय, रुग्णालयं, शाळा, कर्मचाऱ्यांचे पगार यावर खर्च करतं. पायाभूत विकासासाठीही संस्थानाकडून शिर्डी नगरपालिकेला निधी दिला जातो. याशिवाय राज्यातल्या काही सामाजिक संस्था, धार्मिक तीर्थक्षेत्र यांनाही विकासकामांसाठी संस्थानाच्या माध्यमातून निधी दिला जातो.
 
 
 

First Published: Wednesday, April 4, 2012, 16:55


comments powered by Disqus