Last Updated: Tuesday, April 24, 2012, 09:59
www.24taas.com, पुणे 
पुण्यात एक अनोखा विवाह सोहळा रंगला. हा विवाह सोहळा होता बाहुला-बाहुलीचा. आणि तो आयोजित करण्यात आला होता गतिमंद मुलांसाठी. अगदी खऱ्या खुऱ्या लग्न सोहळ्याला लाजवेल असा हा सोहळा झाला.
लग्नसराईचे दिवस आणि शाळांना लागलेल्या सुट्ट्या. यामुळे शाळकरी मुलं घरच्या लग्नसमारंभांमध्ये मिरवत सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतात. मात्र गतिमंद मुलांना अशा प्रकारे लग्नसमारंभांचा मनस्वी आनेद घेता येत नाही. अशाच गतिमंदांसाठी आयोजित केलेला बाहुली अपेक्षा आणि बाहुला संदेशचा लग्न सोहळा साजरा करण्यात आला. बाहुला बाहुलीचं लग्न असलं तरी ते अगदी खऱ्या खुऱ्या लग्नासारखं साजरं करण्यात आलं. बॅँड-बाजा, नटून थटून आलेली वऱ्हाडी मंडळी, लग्ममंडपातला थाटही खऱ्या खुऱ्या लग्नाप्रमाणेच.
रुखवतही लक्ष वेधून घेणारा. गतिमंद मुलांसाठी काम करणारी सावली संस्था आणि मैत्र युवा फाऊंडेशनने या अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. बाहुलीच्या लग्नात गतिमंद मुलांनी काही मंगलाष्टकाही म्हटल्या. लग्नानंतर वाजत गाजत वरात देखील काढण्यात आली. कीर्ती शिलेदार, शाळा चित्रपटातला जोश्या यांनीदेखील या लग्नाला हजेरी लावून या उपक्रमाला दाद दिली. हा विवाह सोहळा गतिमंद मुलांना सुटीचा आणि लग्नात सहभागी झाल्याचा आनंद नक्कीच देऊन गेले असेल .
First Published: Tuesday, April 24, 2012, 09:59