Last Updated: Sunday, April 29, 2012, 19:39
कैलास पुरी,24taas.com, पुणे पिंपरी चिंचवड मधल्या एका संकुलातील रहिवाशांना पालिकेच्या दुर्लक्षामुळे अक्षरश: गटारावर रहावं लागतंय.. अनेकवेळा तक्रारी करूनही गेली पाच वर्षे नागरिकांना केवळ आश्वासनं मिळतायेत..ISO प्रमाणपत्र मिळालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा भोंगळ कारभार आहे...
ही दृश्यं पाहिल्यावर तुम्हाला हे गटार असल्यासारखंच वाटेल. परंतु हे गटार नाहीय तर हे आहे एका बिल्डींगचं पार्किंग. दापोडी परिसरातल्या गगनगिरी संकुलात्या ४४ कुटुंबांना या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय. पार्किंग स्लॉट सखल भागात असल्यानं आणि पाणी निचर्याची सोय नसल्यानं इथं जवळपास ३ फूट पाणी तुंबलंय.. शेजारच्या गणेश हाइट्समधल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमधून गळणारं पाणीही त्यामध्ये साचतंय. दुर्गंधीयुक्त पाणी आणि त्यावर वाढणार्या डासांमुळे रोगराई पसरण्याचा धोका आहे. इमारतीमधले दुकानदार पार्किंग स्लॉटचा सर्रासर स्वच्छतागृहासारखा वापर करतात. या सगळ्यामुळे या सोसायटीत राहणारे रहिवासी हवालदिल झालेत..
दुसरीकडं पालिका मात्र कार्यवाहीऐवजी फक्त आश्वासनं देतेय...एकीकड सुंदर शहर म्हणून गाजावाजा करायचा आणि दुसरीकडं नागरिकांना अशा प्रकारे गटारांवर राहायला लावायचं. हे चित्र ISO मानांकन मिळवणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेला नक्कीच शोभणारं नाही...
First Published: Sunday, April 29, 2012, 19:39