सोनाराच्या दुकानात फिल्म स्टाईल चोरी - Marathi News 24taas.com

सोनाराच्या दुकानात फिल्म स्टाईल चोरी

www.24taas.com, पुणे
 
पुण्यातील  हडपसर परिसरात एक अजब चोरी घडलीय. एक चोर ग्राहक बनून सोन्याच्या पेढीवर आला. आणि त्यानं काही कळायच्या आतच दुकानातल्या सोनसाखळ्या लांबवल्या.  चोर फरार झाला असला, तरी सी.सी.टी.वी. कॅमे-यात मात्र त्याची ही फिल्मीस्टाईल चोरी कैद झाली.
 
हडपसर मधील मोती ज्वेलर्स या सराफा दुकानात एक भामटा मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास दाखल झाला. त्यानं सोनसाखळ्या पाहण्यासाठी मागितल्या. दुकानाचे मालक मुकेश सोनी यांनी त्याला एक सोनसाखळी दाखवली. त्यानंतर दुसरी दाखवली. दोन्हीत फरक असल्याचे या चोरानं सांगितलं. त्यावर सोनी यांनी तिसरी साखळी या भामट्याला पाहण्यासाठी दिली. आणि तिसरी साखळी हाती येताच या भामट्यानं धूम ठोकली.
 
चोर पळतोय हे पाहताच सोनी यांनी देखील त्याचा पाठलाग केला. पण त्यांचं दुर्दैवं दुकानाबाहेर मोटरसायकलवर तयारीत असलेल्या त्याच्या साथीदाराच्या मदतीनं हा चोर पसार होण्यात यशस्वी ठरला. सोनी यांच्या दुकानातील ४०हजार रूपये किमतीच्या सोनसाखळ्या या चोरट्यांनी हातोहात लांबवल्या. याबाबत सोनी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. मात्र,अजून या चोरांचा तपास लागलेला नाही.

First Published: Wednesday, May 2, 2012, 20:34


comments powered by Disqus