दहशतवाद्यांचे पुणे, मुंबई, दिल्ली टार्गेट - Marathi News 24taas.com

दहशतवाद्यांचे पुणे, मुंबई, दिल्ली टार्गेट

www.24taas.com,पुणे
 
'लष्कर ए तैयबा'चे सहा संशयित दहशतवादी पुणे, मुंबईसह देशातल्या पाच शहरांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर विभागानं दिला आहे. पुणे, मुंबई, अहमदाबाद, सुरत आणि दिल्ली या पाच शहरांना प्रामुख्यानं धोका असून, पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
पुण्यातील राष्ट्रीय छात्र प्रबोधिनी अर्थात एनडीएची एका दहशतवाद्यानं रेकी केल्याची बाब तपासात पुढे आल्यानं, एनडीएभोवतालची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. 'लष्कर ए तैयबा'च्या पाच संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रं पुण्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांना वितरित करण्यात आली आहेत. गृहमंत्री आर आर पाटील यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
'लष्कर ए तैयबा'च्या पाच संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रे 'आयबी'ने उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, त्यांची नावे दिलेली नाहीत. वेगवेगळ्या गुन्ह्यांत त्यांनी वेगवेगळी नावे वापरली होती. त्यांतून मिळालेल्या माहितीनुसार ही छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. त्यांना पकडण्यासाठी अनेक राज्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या संघटनेच्या एका हस्तकाचा जर्मन बेकरीतील स्फोटात सहभाग असल्याचेही तपासात आढळले आहे. शहर पोलिसांबरोबरच दहशतवादविरोधी पथकाकडूनही या संशयितांचा सध्या तपास सुरू असल्याचे उच्चपदस्थ पोलिस सूत्रांनी सांगितले.
 
पुण्यातील 'एनडीए' भोवतालची सुरक्षा व्यवस्था काटेकोर करण्यात आली आहे. लष्कराच्या तेथील पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून सध्या त्याच्याकडे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सुनील तांबे यांचे पथक तपास करीत आहे. बुधवारीही त्यांचे पथक 'एनडीए'मध्ये चौकशीसाठी गेले होते. शहरातील अन्य संवेदनशील ठिकाणांसह लोहगाव विमानतळाभोवतालच्या बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.
 
पोलीस आयुक्तालयात बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रे देण्यात आली आहेत.  तसेच तपास मोहिमेदरम्यान पोलिसांनी कोणती काळजी घ्यावी, याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या दहशतवाद्यांबाबत माहिती कळल्यास 100 या क्रमांकावर ती कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

First Published: Thursday, May 10, 2012, 10:53


comments powered by Disqus