Last Updated: Saturday, March 23, 2013, 11:13
www.24taas.com, सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्यातल्या कालवी बंदर इथं कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कासवाची लहान लहान पिल्लं पाहण्याचा अनुभव घेता आला. ‘सह्याद्री निसर्गमित्र’ आणि ‘यू.एन.डी.पी’च्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. दरवर्षी अंडी देण्यासाठी ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाची पावलं कोकण किनारपट्टीकडं वळतात. मध्यंतरी ही कासवाची अंडी असुरक्षित बनली होती. त्यामुळं स्थानिक मच्छिमारांमध्ये जागृती व्हावी यासाठी कोकण किनाऱ्यावर विविध सामाजिक संस्थांकडून अशाप्रकारे कासव महोत्सव भरवण्यात येतं.
सागरी कासवांची घरटी संरक्षित करून त्यातील अंडी उबविण्यावर लक्ष ठेवून, रात्री समुद्र किनाऱ्यांवर गस्त घालून त्यांचे व्यवस्थापन करून या समाजसेवी संस्थांतील कार्यकर्त्यांनी कासवाचं जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय. कालवी बंदर इथं भरवण्यात आलेल्या महोत्सवाला कासवप्रेमी पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
First Published: Saturday, March 23, 2013, 11:06