दोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता Two child murdered by mother

दोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता

दोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता
www.24taas.com, झी मीडिया, शिराळा

घरातील भांडणातून शिराळा येथील नाझरे गल्लीत राहणाऱ्या वैशाली सुनील कानकात्रे-शिरंबेकर (वय २५) या महिलेने स्वत:च्या दोन मुलांना संकेत सुनील कानकात्रे (५) व अक्षय कानकात्रे (४) विहिरीत ढकलून दिले. रविवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.

नाझरे गल्लीत वैशाली आपल्या पतीसह सुनील बाळासाहेब कानकात्रे-शिरंबेकर (३२) हे राहत होती. या दाम्पत्यांमध्ये सतत वाद होत असे, यातच शनिवारी देखील त्यांच्यात जेवणाच्या कारणावरुन भांडण झालं. यात वैशालीने सुनीलला लाटण्याने मारुन जखमी केले. याबाबत सुनीलने वैशालीचे वडील वसंत फल्ले आणि तिचा भाऊ अजय यांना फोनकरुन कळविले होते.

रविवारी दुपारी एकच्या सूमारास वैशाली दोन्ही मुलांना घेऊन घरातून बाहेर निघाली. सुनीलने वैशाली व मुलांचा शोध घेतला, पण त्यांचा शोध न लागल्याने सुनील घरी परतला. याचवेळी वैशालीने आपल्या मुलांना विहरीत ढकलून शिराळा पोलीस स्टेशन गाठले. तिथे तीने, "माझ्या मुलांना तहान लागली म्हणून मी भुईकोट किल्ल्याजवळील हिरवडेकर यांच्या विहिरीत पाणी पाजण्यासाठी घेऊन येत असताना, मला व दोन्ही मुलांना पतीने विहिरीत ढकलले. मला पोहता येत असल्याने मी विहिरीतून बाहेर पडले, मात्र मी दोन्ही मुलांना वाचवू शकले नाही", असा जबाब नोंदवला. यानंतर पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केल्यानंतर, वैशालीने खून केल्याचं कबुल केलं. वैशालीने दोन्ही मुलांना साडीत गुंडाळून विहिरीत टाकल्याचे मान्य केले. यानंतर विहिरीजवळ राहणाऱ्या कुटुंबातील एका महिलेची साडी नेसून वैशाली पोलीस ठाण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. दोन तास विहिरीत मुलांचा शोध सूरु होता. अखेर दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 13:58


comments powered by Disqus