Last Updated: Monday, December 23, 2013, 17:43
www.24taas.com, झी मीडिया, पुणे सत्तावीस वर्षीय विवाहितेवर चाकणमध्ये बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवून त्या आधारे छळणाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहा दिवसांपूर्वी स्वतःला पेटवून घेतलेल्या विवाहितेचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री या महिलेने चाकण पोलिसांना या धक्कादायक प्रकाराचा जबाब दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी चाकणच्या एकता नगर भागातील चार पुरुषांसह दोन महिलांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
नमिता अनिल थोरात (२७, सध्या रा. एकता नगर, चाकण, ता. खेड, मूळ रा. सदाशिव पेठ, पुणे) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून चाकण पोलिसांनी एकता नगर भागातील अक्षय बोंबले याच्यासह त्याची आई, दत्ता नामक एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला असून सर्व जण फरारी आहेत. काही महिन्यांपूर्वी या विवाहितेवर इंडिका कारमध्ये बलात्कार करण्यात आला होता आणि त्याची अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आली होती. त्या आधारे तिला छळण्याचे प्रकार सुरू होते. त्या व्हिडिओच्या आधारे वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे कंटाळून आणि वरील सहा जणांनी एका भांडणात या महिलेच्या चारित्र्यावर उघडपणे प्रश्नचिन्ह लावले होते.
त्यामुळे त्रासलेल्या या महिलेने मागील शनिवारी १४ डिसेंबर रोजी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. तिच्यावर पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या वेळी तिने चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना ससून रुग्णालयात धक्कादायक जबाब देताना वरील घटनेचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर रविवारी पहाटे या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 23, 2013, 17:43