वॅक्स म्युझियममध्ये शिवशाहीर पुरंदरेंचा मेणाचा पुतळा Wax Statue of Babasaheb Purendare

वॅक्स म्युझियममध्ये शिवशाहीर पुरंदरेंचा मेणाचा पुतळा

वॅक्स म्युझियममध्ये शिवशाहीर पुरंदरेंचा मेणाचा पुतळा
www.24taas.com, पुणे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा मेणाचा पुतळा बनविण्याचे कार्य लोणावळा येथील सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये पूर्ण करण्यात आलंय. लवकरच या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. लंडनच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम प्रमाणे केरळचे शिल्पकार सुनील कन्डल्लूर यांनी लोण्यावळ्यात सुनील्स सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम तयार केलंय.

लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियम मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, क्रिकेटपटू कपिल देव, पं. जवाहरलाल नेहरू, स्वामी विवेकानंद इत्यादी सेलिबेट्रींचे ३१ पुतळे तयार करण्यात आलेत. भारतीय चित्रपटसृष्टीचे पिता म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

शिल्पकार सुनील यांनी आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा मेणाचा पुतळा तयार केलाय. येत्या रविवारी स्वत: बाबासाहेब पुरंदरे आणि प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव कुलकर्णी लोणावळ्यात जाऊन हा पुतळा पाहणार आहेत. आवश्यकता वाटल्यास त्यात सुधारणा करण्याचे सुचवणार आहेत. सुनील कन्डल्लूर यांनी सांगितले की, बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या शरीराची मापं घेऊन मेणाचा पुतळा तयार करण्यात आलाय.

गेल्या दोन महिन्यांपासून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे कार्य करण्यात शिल्पकार सुनिल व्यस्त होते. बाबासाहेबांचा पोशाख, दाढी, केस यावर विशेष कार्य करण्यात आलयं. त्यासाठी सुमारे २ लाखांचा खर्च आला. बाबासाहेबांच्या सूचनेनंतर पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण व्हावे, अशी बाबासाहेबांची तसेच सर्व शिल्पकारांची इच्छा असल्याचे सदाशिव कुलकर्णी यांनी सांगितले.

सुनील कन्डल्लूर हे भारतातील पहिले वॅक्स मॉडेल आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. लोणावळा येथे त्यांनी स्वत:चे पहिले वॅक्स म्युझियम तयार केलंय. बाबासाहेब पुरंदरेंप्रमाणे लतादीदी, अमिताभ बच्चन अशा अनेक सेलिब्रिंटींचे पुतळे तयार करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

First Published: Thursday, October 18, 2012, 15:52


comments powered by Disqus