Last Updated: Tuesday, August 21, 2012, 09:02
www.24taas.com, लोणावळा लोणावळ्याच्या तुंगार्ली धरणामध्ये बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांनी बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळालंय.
रविवारी रिक्सन डिसोझा हा २४ वर्षांचा तरुण लोणावळ्याच्या तुंबार्ली धरणात त्याच्या मित्रांसह पिकनिकला गेला होता. रिक्सन धरणात पोहायला उतरला असताना बुडायला लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. लोणावळा पोलीस आणि स्थानिक शिवदुर्ग मित्र संघटनेच्या बचाव पथकाकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत रिक्सन याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु होतं. मात्र, त्याला यश मिळालं नाही.
अखेर तळेगावमधल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. ३५ जवान, दोन बोटी आणि पाणबुडीच्या मदतीनं ही मोहीम सुरू होती. सोमवारी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास तब्बल २४ तासांनी रिक्सनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रिक्सनच्या मृत्यूमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. महिनाभरात या धरणात बुडण्याची ही चौथी घटना आहे.
First Published: Tuesday, August 21, 2012, 09:02