दिवसाढवळ्या पळवलं, कुंटणखान्यात डांबलं आणि..., young girl kidnapped for work as sex worker in pune

दिवसाढवळ्या पळवलं, कुंटणखान्यात डांबलं आणि...

दिवसाढवळ्या पळवलं, कुंटणखान्यात डांबलं आणि...
www.24taas.com, पुणे

पुण्यातील अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आलीय. एका तरुणीला राजरोसपणे पळवलं जातं... कुंटणखान्यात डांबलं जातं... आणि पोलीस या तरुणीची तक्रार नोंदवण्याची आपली ड्युटीही पार पाडत नाहीत... जे कायदे सध्या अस्तित्वात आहेत तेच पाळले जात नाहीत तेव्हा खरंच प्रश्न पडतो की नवीन आणि कठोर कायदे बनवून त्यांचा खरंच फायदा होईल का?

पुण्यात राहणारी ही तरूणी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह 3 जानेवारी रोजी शिर्डीला जात होती. अहमदनगरमध्ये त्यांनी एका ठिकाणी विश्रांतीसाठी जीप थांबवली. तिचा होणारा नवरा टॉयलेटला गेला आणि ही मुलगी गाडीजवळ उभी राहिली होती. तेवढ्यात एक गाडी आली... त्यांनी तिच्या तोंडाला रूमाल लावला... ती बेशुध्द पडली... त्या गाडीत एक महिला आणि दोन पुरूष होते... या तरुणीला जेव्हा शुध्द आली तेव्हा ती धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमधल्या एका कुंटणखान्यात होती. त्यानंतर तिच्याकडून बळजबरीनं वेश्याव्यवसाय करून घेण्याचा प्रयत्नही झाला.

इथून सुटका करून घेण्यासाठी आपल्याकडे आलेल्या एका गिऱ्हाईकामार्फत तिने तिच्या मित्राला फोन लावला. या मित्राने सामाजिक कार्यकर्ता असलेल्या त्याच्या मित्राच्या मार्फत पुणे पोलिसांशी संपर्क साधला. पुणे पोलिसांनी हा प्रकार त्यांना धुळे पोलिसांच्या हद्दीत येत असल्याचं सांगून त्यांना धुळे पोलिसांत जायला सांगितलं. शिरपूर पोलिसांनी त्या मुलीची कुंटणखान्यातून ५ जानेवारी रोजी सुटका केली. मात्र, या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदवला नाही.

त्यानंतर हे जोडपं पुण्यात आलं. त्यांनी पुण्यातल्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांशी संपर्क साधला. पुणे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तातडीने गुन्हा नोंदवला. ही घटना नगरमधल्या तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यानं कोरेगाव पार्क पोलिसांनी पीडीत तरूणीला एका पोलिसासह नगरमधल्या तोफखाना पोलिसांकडे पाठवलं. तोफखाना पोलिसांनी त्यांना नगरचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याकडे पाठवलं. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून घेणं तर दूरच बारकुडं यांनी या तरूणीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांनी ही तरूणी आणि तिच्यासोबत पुणे पोलिसांनी पाठवलेल्या पोलिसाला हाकलून लावलं. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा पुणे पोलिसांकडे आलं, पुणे पोलिसांनी वरिष्ठांच्यामार्फत हे प्रकरण नगर पोलिसांकडे पाठवलं आणि अखेर नगरमधल्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, पीडीत तरूणीला ज्या कुंटणखान्यामध्ये ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी पुण्यातल्या आणखी काही मुली असल्याची माहिती तिने दिलीय.

First Published: Friday, January 11, 2013, 20:15


comments powered by Disqus