‘झी २४ तास’चा दणका... मनसेची माघार!, zee 24 taas impact on MNS kolhapur mahalaxmi temple

‘झी २४ तास’चा दणका... मनसेची माघार!

‘झी २४ तास’चा दणका... मनसेची माघार!
www.24taas.com, कोल्हापूर
बातमी ‘झी २४ तास’ इम्पॅक्टची... मासिक पाळी सुरू असताना महिला कामावर आल्या तर प्रसादाचं पावित्र नष्ठ होऊ शकतं, त्यामुळं महिला बचत गटांना लाडू प्रसादाचं टेंडर देवू नये अशी मागणी करणाऱ्या मनसेनं आता माघार घेतलीय. ‘झी २४ तास’नं ही बातमी प्रसारित केल्यानंतर लगेचच मनसेनं महिलांना टेंडर न देण्याच्या मागणीचं पत्रक मागे घेतल्याची घोषणा केलीय.

महिलांमुळं महालक्ष्मीच्या प्रसादाचं पावित्र्य नष्ठ होत असल्यानं महिला बचत गटांना प्रसादाचं कंत्राट देऊ नये अशी संतापजनक मागणी कोल्हापूरच्या मनसे जिल्हाध्यक्षांनी केली होती. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरात लाडूच्या प्रसादाचा ठेका महिला बचत गटांना देण्यासाठी ६ जून २०१२ ला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीनं जाहीर कोटेशन काढण्यात आलं. त्यानंतर ८ ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उदय पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून महिला मासिक पाळीच्या वेळी जर कामावर आल्या तर प्रसादाचं पावित्र नष्ठ होऊ शकतं, त्यामुळं महिला बचत गटांना लाडू प्रसादाचं टेंडर देवू नये अशी मागणी केली होती. जिल्हाध्यक्ष उदय पवार यांच्या या भूमीकेमुळं महिला वर्गातून आणि विविध समाजिक संघटनातून संताप व्यक्त झाला. महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी संघर्ष करणाऱ्या मनसेला अचानक महिलांचं वावडं का? असा प्रश्न यामुळं निर्माण झाला होता. मात्र ‘झी २४ तास’नं या वृत्ताची दखल घेतल्यानंतर लगेचच मनसेनं माघार घेत पत्रक मागे घेतल्याची घोषणा केलीय.

First Published: Tuesday, October 2, 2012, 11:17


comments powered by Disqus