Last Updated: Tuesday, April 30, 2013, 21:10
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली आपल्या प्रक्षोभक भाषणांनी समाजात तेढ निर्माण करणे किंवा द्वेषाची भावना वाढविणाऱ्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांवर कारवाई करण्याची हिंमत केंद्र आणि राज्य सरकारने दाखवावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. अशा व्यक्तींविरूद्ध कारवाई करताना कोणतीही दया भाव दाखवू नये , असेही कोर्टाने म्हटले आहे.
एका स्वयंसेवी संस्थेने याविषयीची जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश अल्टमस कबीर , न्या. विक्रमजित सेन आणि न्या. शरद अरविंद बोबडे यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील मत व्यक्त केले.
केंद्र याविषयामध्ये कधी मत मांडू शकते , अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे. ` हा विषय राज्यांच्या अखत्यारितील असून त्यावर राज्य सरकारांनीच उपाय शोधण्याची आवश्यकता आहे ,` असे मत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सिद्धार्थ लुथ्रा यांनी कोर्टासमोर मांडले. त्यावर ही जबाबदारी केंद्र आणि राज्य या दोघांचीही आहे , असे मत कोर्टाने व्यक्त केले.
हैदराबादमधील आमदार अकबरूद्दीन ओवेसी , विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख करून सुप्रीम कोर्टाने विद्वेष पसरविणाऱ्या नेत्यांविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे नोंदवावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाईचे धारिष्ट्य दाखवावे , असे म्हटले आहे.
` तेढ पसरविणाऱ्या भाषणांना कशा पद्धतीने आळा बसू शकेल, हे शोधण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. देशाच्या सामाजिक स्वाथ्याचा विचार केला , तर या गोष्टी निश्चितच सुखावह नाहीत. समस्येवर उपाय योजना करून त्याची ठोस अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्र सरकार राज्यांना देऊ शकते ,` असेही कोर्टाने सुचविले आहे.
मुक्ताफळं.. हिंदुस्थानमध्ये हिंदू शंभर कोटी आहेत. आम्ही फक्त २५ कोटी आहोत ना... फक्त पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना हटवा दाखवून देऊ... कोणात हिंमत आहे... -
अकबरुद्दीन ओवेसी ,` एमआयएम ` चे आमदार नुसतंच फक्त बलात्कार , बलात्कार , बलात्कार असं चालू आहे. बलात्कार झाल्यानंतर ते सगळे बिहारचे होते , याबद्दल कोणी बोलायचे नाही. हे सगळं काय आहे...
- राज ठाकरे ,अध्यक्ष , मनसेकधी कधी कुत्री स्वतःला सिंह समजू लागतात. हैदराबादमधील असाच एक कुत्रा पोलिसांना हटविण्याची भाषा करतोय. अरे , पोलिस हटल्यानंतर काय होतं , ते आसाममध्ये पहा...
-प्रवीण तोगडिया , आंतरराष्ट्रीय अध्यक्ष , विहिंप
First Published: Tuesday, April 30, 2013, 21:03