बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी राज ठाकरेंची गैरहजेरी!, raj absent, first death anniversary of balasaheb

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी राज ठाकरेंची गैरहजेरी!

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी राज ठाकरेंची गैरहजेरी!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीने शिवाजी पार्क पुन्हा गहीवरलं. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतीदिनादिवशी स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. राज ठाकरे मात्र यावेळी उपस्थित नव्हते.

१७ नोव्हेंबर हा दिवस उजाडला तोच बाळासाहेबांच्या आठवणीने... अगदी पहाटेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या दिवशी प्रत्येक शिवसैनिक गहीवरला होता. शिवाजी पार्कवर ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले त्याठिकाणी स्मृतीस्थळाची उभारणी करण्यात आलीय. त्याठिकाणी बाळासाहेबांच्या दर्शनासाठी राज्यभरातून शिवसैनिक दाखल झाले.

शिवाजी पार्कवर सकाळपासूनच ‘परत या परत या… बाळासाहेब परत या’ अशी आर्त साद शिवसैनिक बाळासाहेबांना घालत होते. साहेबांच्या स्मृतीस्थळापुढे नतमस्तक होताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला मानणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक आदेशाला शिरसावंद्य मानणाऱ्या शिवसैनिकांचे डोळे साहेबांच्या आठवणीने पाणावले होते. कंठ दाटून आले होते. बाळासाहेबांच्या आठवणी निघत होत्या. याच शिवतीर्थावर अनेक दसरा मेळाव्यात साहेबांनी दिलेलं विचारांचं सोनं अनेकांनी लुटलं होतं. त्याची आठवण निघत होती. बाळासाहेबांच्या निधनाने अनेक शिवसैनिकांना प्रत्यक्ष पितृछत्रचं नाहीसं झाल्याची भावना झाली होती. साहेबांच्या दर्शनासाठी दिवसभर उन्हाची पर्वा न करता हजारो शिवसैनिकांनी रांगा लावल्या होत्या. सर्वांच्या मनात होती बाळासाहेबांची एकतरी आठवण

नेहमीच साहेबांच्या तेजस्वी भाषणाने दुमदुमणाऱ्या शिवाजी पार्कावर मात्र साहेबांच्या आठवणीने मूक हुंदका उमटला होता. बाळासाहेबांच्या दर्शनासाठी शिवसैनिकांप्रमाणे सर्व महत्त्वाच्या पक्षांचे नेतेही हजर झाले होते. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांनीही अनेक शिवसैनिकांशी संवाद साधला. अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं वडीलकीच्या नात्याने सांत्वन केलं. पण, या सगळ्यात राज ठाकरेंची अनुपस्थिती मात्र उठून दिसत होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013, 08:27


comments powered by Disqus