Last Updated: Thursday, March 21, 2013, 18:21
www.24taas.com, मुंबईराष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे नेते न्यायालयात काम म्हणणे मांडणार याकडे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर अहमदनगरमध्ये राज यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. या दगडफेकीनंतर राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली. या नेत्यांनी कार्यकर्त्यांना भडकावल्याची भावना आहे. त्यातून राज्यात हिंसाचार पाहायला मिळाला. या हिंसाचाला जबाबदार ठरवत उच्च न्यायालयाने पवार, आर आर आणि राज ठाकरे तसेच राज्य शासनाला नोटीस बजावली आहे.
राज्यात झालेल्या धुमश्चक्रीबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, हिंसाचाराला पवार आणि ठाकरे यांना जबाबदार ठरवून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज यांनी राज्यात काही सभा घेतल्या होत्या. या सभेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेत्यांवर टीका केली होती.
राज यांच्या टीकेनंतर मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यातील वादामुळे राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेचा भंग झाला. या परिस्थितीला ठाकरे, पवार यांना जबाबदार मानून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी जनशक्ती या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे.
First Published: Thursday, March 21, 2013, 18:14