मला टाळी आली, मी टाटा केला – राज ठाकरे, Raj Thackeray in mumbai

मला टाळी आली, मी टाटा केला – राज ठाकरे

मला टाळी आली, मी टाटा केला – राज ठाकरे
www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला. त्याचवेळी शिवसेनेला जोरदार टोला हाणला. काल सकाळी वर्तमानपत्रातून पुन्हा एक `टाळी` आली, मग मी दुपारी `टाटा` केला.

मनसेचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. शिवसेनेचे नाव न घेता युतीबाबत राज ठाकरे यांनी ‘टाटा’ केला. या लोकांना काही दुसरा उद्योग आहे की नाही?... जरा आत्मपरीक्षण करा, सारखे कसले खिडकीतून डोळे मारताय?, असा चिमटा राज यांनी शिवसेनेला काढला. राज्यात महायुतीची `विशालयुती` होण्याबाबतच्या चर्चेला उधाण आलं होतं.

शिवसेना-भाजप-रिपाईला मनसेचं इंजिन जोडलं जाणार, असं वृत्त राजकीय वर्तुळात पसरलं होतं. त्यामुळे या नव्या समीकरणाबाबत राज आज काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच कान लागले होते. ही उत्सुकता लक्षात घेऊन आणि कुठल्याही शंकेला वाव राहू नये, या उद्देशानं राज यांनी हा विषय पुन्हा आपल्या `स्टाइल`नं निकाली फेटाळला. उद्योगपती रतन टाटा भेटायला आले, हे तुमचं यश आहे, अशी कौतुकाची थाप राज यांनी कार्यकर्त्यांच्या पाठिवर मारली. जे काही चाललं आहे ते तुमच्यामुळे सर्व चाललं आहे. माझ्यात हिंमत येते ती तुमच्यामुळेच. मी पक्ष स्थापन केला त्यावेळी तुम्ही आले नसतात तर...काय झालं असतं..हे उच्चारलं तरी अंगावर काटा येतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी `सामना`मधून राज यांच्याकडे `टाळी` मागितली होती. पण, कोल्हापूरच्या सभेत राज यांनी त्यांना `टाळी`ऐवजी टोला लगावला होता. तिच भूमिका त्यांनी आजही कायम ठेवत टाळीला टाटा केला. महाराष्ट्रात मनसेची सत्ता आणणार म्हणजे आणणारच आणि तीही स्वबळावरच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हे जे काही (विशालयुती) बोललं जातंय, त्या गोष्टी खरंच घडताहेत का हे मला तरी माहिती नाही, असं म्हणून त्यांनी या चर्चा बोगस ठरवल्या आणि `विशालयुती`च्या विषयावर पडदा टाकला. मात्र, सत्ता हवी असेल तर कार्यकर्त्यांनी जागते राहिले पाहिजे, असा गंभीर इशारा राज यांनी यावेळी दिला.

First Published: Saturday, March 9, 2013, 15:43


comments powered by Disqus