Last Updated: Monday, March 25, 2013, 17:42
www.24taas.com, मुंबई‘माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करीन’ असे वेळोवेळी सांगणाऱ्या मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या हातात सत्ता गेली तर मिलच्या जागांसह ते संपूर्ण महाराष्ट्र ते विकून खातील’, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नाशिक येथे केली.
काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्यानिमित्त रविवारी नाशकातील कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्षमपणे उपायोजना राबवित आहे.
सामाजिक, राजकीय संघटनांकडून मदत होत आहे. तर दुसरीकडे दुष्काळी भागाचे दौरे करण्याच्या नावाखाली विरोधकांकडून केवळ सरकारला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरात सभा घेणाऱ्या नेत्याकडून दुष्काळाचे भांडवल केले जात आहे. या टीकेला जशाच्या तसे उत्तर देण्यासाठी पक्षश्रेष्ठी, विशेषत: मुख्यमंत्र्यांनी सक्रीय झाले पाहिजे.
त्यांच्यापाठोपाठ पक्षाचे सर्वच पदाधिकारी विरोधकांवर तुटून पडतील,’ असे ते म्हणाले. सर्वच राजकीय पक्षांमध्ये व्यक्तीगत आरोप करून एकेकाला बाजूला काढण्याचे काम चालू असल्याचे सांगत चव्हाण यांनी आपल्यावरही अन्याय झाल्याची भावना बोलून दाखविली.
First Published: Monday, March 25, 2013, 17:42